पारंपरिक आयुर्वेदीय घटकांचे लाभ जाणा !

अंगाला उटणे लावा

अभ्यंगामुळे अंगाला लागलेले अतिरिक्त तेल उटणे लावल्याने जाते. यासाठी ‘(सनातन) उटणे’, हरभर्‍याचे किंवा चण्याचे पीठही वापरू शकतो. उटणे लावल्याने चरबी न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे स्थूल माणसांनी उटणे लावावेच.

स्नानाच्या वेळी साबण अल्पांशाने वापरा

स्नानाच्या वेळी साबण लावू नये. साबणातील कृत्रिम द्रव्यांमुळे त्वचा रूक्ष बनते. साबणाऐवजी वर सांगितल्याप्रमाणे उटणे लावावे. एका वेळी अंगाला लावण्यासाठी २ चमचे उटणे पुरेसे होते. उटण्याप्रमाणेच मुलतानी माती किंवा वारुळाची मातीही वापरता येते, तसेच शिकेकाई, आवळकाठी, रिठे, तीळ यांचे चूर्ण एकत्र करून त्याचा साबणासारखा वापर करता येतो.

स्नान करतांना साबण न लावणे हे आदर्श असले, तरी अंगाला लागलेले अतिरिक्त तेल काढण्यासाठी काही जणांना साबण लावणे सोयीचे वाटते. अशा वेळी साबण लावल्यावर अंग जास्त रगडू नये. त्वचेवरील सर्व तेल साबणाने न काढता तेलाचा थोडासा ओशटपणा त्वचेवर राहू द्यावा. अंग पुसल्यानंतर त्वचेवर आवश्यक तेवढा तेलकटपणा रहातो, तेल कपड्यांना लागत नाही आणि या तेलकटपणाचा त्रास न होता त्वचा मऊ रहाण्यास लाभ होतो.

शॅम्पूपेक्षा शिकेकाई वापरा

स्नान करतांना केसांना शॅम्पू लावू नये. साबणासारखा फेस येणार्‍या शॅम्पूमध्ये ‘सोडियम लॉरिल सल्फेट’ नावाचे विषारी द्रव्य असते. शॅम्पूपेक्षा ‘(सनातन) शिकेकाई’ वापरू शकतो.