दैनंदिन जीवनात आयुर्वेदाला प्राधान्य द्यायला हवे ! – वैद्य खडीवाले, वैद्यक संशोधन संस्था

आपल्या दातांचे आरोग्य आम्ही कडूलिंब, बाभूळ, करंज इत्यादींच्या मऊ काड्यांच्या दंतधावनाने चांगले ठेवू शकतो. पुष्कळ वर्षांपूर्वी जर्मनीत जगातील तीनशेच्या वर विविध वनस्पतींचे संशोधन दातांच्या आरोग्यासाठी झाले. त्यात कडूलिंबाच्या आंतरसालीचे दंतआरोग्याकरिता निर्विवाद महत्त्व सिद्ध झाले. प्रातःकाळी करंजाची काडी चघळून पहावी. दात, जीभ किती चटकन स्वच्छ होतात ! विविध विदेशी आस्थापनांच्या टूथपेस्टपेक्षा दंतमंजन वापरणे केव्हाही तुमच्या हिताचे आहे.

तोंडवळ्याला विविध क्रीम लावण्यापेक्षा शतधौत धृत वा चंदन, गंध वा दशांग लेप यांचा वापर करू शकतो. सर्वांगाला क्लोरीनयुक्त साबण वापरण्यापेक्षा उपळसरी, कोळिंजन, कडूलिंबसाल, वेखंड, देवदार, आवळकाठी, ज्येष्ठमध, हिरडा, बावची, वाळा, नागरमोथा, शिकेकाई, सुगंधी कचोरा यांनी युक्त अशा चूर्णाचा गरम पाण्यात कालवून वापर करावा.

केसांसाठी महागडा शँपू वापरण्यापेक्षा आवळकाठी, नागरमोथा, बावची, शिकेकाई यांच्या मिश्रणाचे केशचूर्ण वापरावे. तोंडवळ्यावर येणार्‍या तारुण्यपिटिका घालवण्याकरिता ज्येष्ठमध, दारूहळद, अर्जुनसाल, चंदन, वेखंड, रक्तचंदन, मंजिष्ठ, कोळिंजल, हळद असे मिश्रण रात्री दूध किंवा पाण्यातून कालवून तोंडवळ्याला लावावे. बोर्नव्हिटा, फॅरेक्सपेक्षा शतावरी कल्प, बदामकल्प, प्रोत्साहन अशा आयुर्वेदीय साखरेच्या सोप्या औषधांचा वापर वाढवावा. रक्तदाबवृद्धीसाठी रक्तदाबाच्या गोळ्या आयुष्याभर घेण्यापेक्षा बेलाच्या दहा पानांच्या एक कप पाण्यात काढा करून, अर्धा कप उकळूून प्यावा. मीठ वर्ज्य करावे, शवासन करावे. म्हणजे रक्तदाबाच्या गोळ्यांपासून सुटका होईल. सर्वांनीच आयुर्वेदानुसार आचरण केल्यास जीवन खर्‍या अर्थाने निरोगी होईल !

– वैद्य खडीवाले, वैद्यक संशोधन संस्था, शनिवार पेठ, पुणे.