प्रत्येक हॉटेलने एक खोली अलगीकरणासाठी ठेवणे बंधनकारक ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

पर्यटन हंगामासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित !

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – आगामी पर्यटन हंगामात गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी पर्यटकांवर बंदी असणार नाही. पर्यटन हंगामासाठी लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करण्यात येणार आहेत. हॉटेलमध्ये आलेला पर्यटक कोरोनाबाधित झाल्यास त्याला अलगीकरणात ठेवण्यासाठी प्रत्येक हॉटेल चालकाला हॉटेलमधील एक खोली अलगीकरण सुविधेसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणे पत्रकारांशी बोलत होते.

आरोग्यमंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘हॉटेलचालकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करण्याची प्रक्रिया चालू आहे. सध्या राज्यात अलगीकरणात असलेल्या रुग्णांवर कायम देखरेख ठेवण्यात येत असल्याने श्‍वास घेण्यास त्रास होत असलेल्या स्थितीतील कोरोनाबाधित रुग्ण आता सापडणे बंद झाले आहे.’’

सत्ता संपादन करण्यासाठी खोटी आश्‍वासने देणे सोपे असते ! – मंत्री राणे यांची ‘आप’वर टीका

देहली येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत. कुणालाही सत्ता संपादन करण्यासाठी खोटी आश्‍वासने देणे सोपे असते, असा टोला आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी ‘आप’चे देहली येथील नेते राघव चढ्ढा यांच्यावर लगावला. सध्या गोवा दौर्‍यावर असलेले ‘आप’चे देहली येथील नेते राघव चढ्ढा यांनी गोवा शासनावर केलेल्या टिकेच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री राणे यांनी हे वक्तव्य केले.

धारगळ, पेडणे येथील रेडकर रुग्णालयात ‘कोव्हॅक्सीन’ चाचणीच्या तिसर्‍या टप्प्याला प्रारंभ

धारगळ, पेडणे येथील रेडकर रुग्णालयात ‘कोव्हॅक्सीन’ चाचणीच्या तिसर्‍या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. हे रुग्णालय गोव्यातील ‘क्रोम’ संशोधन आस्थापनाच्या सहकार्याने गोव्यात लसीच्या दीड सहस्र चाचण्या करणार आहे. ‘भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ आणि ‘भारत बायोटेक कंपनी’ यांनी ‘कोव्हॅक्सीन’ लस सिद्ध केली आहे. १८ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ झालेल्या लसीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीत भारतभरात २५ सहस्र ५०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. गोव्यातील प्रसिद्ध डॉ. शेखर साळकर यांनीही गोव्यात या लसीच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीत सहभाग घेतला आहे.