१. मद्यप्राशन करणे, त्यास संरक्षण आणि प्रोत्साहन देणे या कृती करणार्या व्यक्ती नैतिक अन् सामाजिक अपराधी होय !
‘मद्यपानास संरक्षण देणे म्हणजे मानवी अधिकारांचे किंवा स्वातंत्र्याचे संरक्षण नाही, तर पाशवी अधिकारांचे संरक्षण आहे; कारण मद्यप्राशन केल्यावर व्यक्ती विवेकशून्य होते आणि मननशील अन् विवेकशील व्यक्तीलाच माणूस म्हणतात. दारू ही मनुष्याला जड, मूढ आणि पशूवत बनवते. त्यामुळे दारूला संरक्षण देणे, प्रोत्साहन देणे, नशा करणे, तसेच नशेची साधने उपलब्ध करून देणे, ही तीनही कामे तथ्य, तर्क, वास्तविकता, तसेच मानवी मूल्यांच्या आधारे नैतिक आणि सामाजिक अपराधांच्याच श्रेणीत येतात.
२. प्रत्येक व्यक्तीला त्याची मुले व्यसनी आणि चारित्र्यहीन निपजू नयेत, असे वाटणे
स्वतःची वयात आलेली मुलगी बेशिस्त मुलांसह पबमध्ये गेली, तिने दारू, सिगारेट आणि नशेत बेधुंद होऊन चारित्र्यहीन, स्वैर आणि उद्दाम मुलांसमवेत अश्लील चाळे केले, दुराचार आणि व्यभिचार केला, तर ते कुठल्या आई-वडिलांना आवडेल ? सिगारेट आणि दारू आदींचा व्यापार करणार्या पित्याला, तरी असे वाटेल का की, त्याची मुले व्यसनांच्या विनाशकारी दुष्टचक्रात अडकून त्यांनी स्वत:चे जीवन अन् तारुण्य धुळीस मिळवावे ? व्यसनांमध्ये अडकलेला माणूसही स्वत:च्या मुलांना व्यसनांपासून वाचवतो. चोर, दुराचारी आणि व्यभिचारी व्यक्तीलासुद्धा वाटते की, त्याची मुले चोर, अप्रामाणिक आणि चारित्र्यहीन निपजू नयेत.
३. दारू मानवाला शारीरिक आणि मानसिक अशा सर्वचदृष्ट्या विकलांग बनवते
नशा करणे, दारू पिणे हे सामाजिक अपराध आहेत आणि सर्वनाशाचे मूळ आहे. दारू, तंबाखू, कोकीन, चरस, गांजा इत्यादी नशा करणे, कामुकता, दुराचार, व्यभिचारी महिलांशी दुर्व्यवहार, अपसंस्कृती, हिंसा हे अपराध आणि पारिवारिक विनाशाची कारणे तर आहेतच, त्याचसमवेत लिव्हर सिरोसिस (यकृताचे रोग), कर्करोग (कॅन्सर), किडनीचे रोग, हृदयरोग, तसेच क्षयरोग (टी.बी.) अशा प्राणघातक रोगांची मुख्य कारणे आहेत. भारतात प्रतिवर्षी दारू आणि तंबाखू अशा नशेच्या वस्तूंचे सेवन केल्याने ५ लाख लोक ‘लिव्हर सिरोसिस’, किडनीचे रोग आणि कर्करोग यांसारख्या रोगांना बळी पडून मरण पावतात. अशा लाखो निष्पाप लोकांच्या मृत्यूंना कारणीभूत दारू आणि तंबाखू इत्यादींचा प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षपणे व्यापार करणारे भागीदार आहेत.
४. लाखो देशवासियांच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्यांवर मनुष्यवधाचे खटले चालवले जाणे आवश्यक !
अमेरिकेसारख्या विकसित देशात तंबाखू, दारू आणि अमली पदार्थ अशा पदार्थांचे सेवन केल्याने आजारी पडलेल्या लोकांच्या उपचारांकरता विक्रेत्यांवर ५ सहस्र कोटी रुपयांचा दंड ठोकला जाऊ शकतो आणि १४८ लोकांच्या हत्येचा ठपका ठेवून सद्दामला फासावर लटकावले जाऊ शकते, तर मग लाखो देशवासियांच्या मृत्यूला उत्तरदायी असलेल्या किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोट्यवधी लोकांची आयुष्ये, घर परिवार, तसेच मुलांच्या विनाशाकरता उत्तरदायी असे व्यापारी आणि दारू विक्रते यांच्यावर मनुष्यवधाचे खटले चालवले पाहिजेत. त्यांना गजाआड ठेवले पाहिजे किंवा फासावर लटकावले पाहिजे.’