कोरोनामुळे जगभरात वर्ष २००९ पेक्षाही मोठी आर्थिक मंदी येईल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा

वॉशिंग्टन – कोरोनाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या आर्थिक हानीचा फटका बसला आहे. त्यामुळे विकसनशील देशांना साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक आस्थापने दिवाळखोरीत निघण्याची भीती आहे. कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याचीही लाट येईल. या प्रमुख चिंता आपल्या सर्वांसमोर आहेत. जागतिक स्थिती पहाता आता जागतिक अर्थव्यस्थेने मंदीच्या काळात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मंदी वर्ष २००९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही मोठी असेल, अशी चेतावणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जॉर्जिव्हा पुढे म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीमुळे उदयोन्मुख बाजारपेठांना अनुमाने २.५ ‘ट्रिलियन डॉलरर्स’ची (अनुमाने १८ लाख कोटी रुपयांची) आवश्यकता आहे. सध्या ८० पेक्षा अधिक देशांनी आधीच आमच्याकडे आपत्कालीन साहाय्य करण्याची विनंती केली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले, तरच वर्ष २०२१ मध्ये या मंदीतून सावरता येणे शक्य आहे.