‘व्यावसायिकांची व्यवसायातून साधना व्हावी’, याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६३ वर्षे) !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई

१. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी

‘बहुतांश उद्योजक (व्यावसायिक) समाजात वावरतांना स्वत:ची ‘उद्योजक’ ही प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतात. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची रहाणी साधी आणि विचारसरणी उच्च आहे. त्यातून त्यांची साधकवृत्ती दिसून येते.

२. डॉ. प्रभुदेसाई यांचा दिनक्रम व्यस्त असतो. असे असतांनाही ‘स्वतःच्या क्षेत्रात कार्यरत राहून साधना म्हणून काय करू शकतो ?’, याचा नेहमी विचार करणे आणि त्यानुसार तत्परतेने कृती करणे’ हे डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्याकडून सर्वांनीच शिकण्यासारखे आहे.

३. पितांबरी आस्थापनात सर्वांनी काम चालू करण्याच्या आरंभी प्रार्थना करणे

पितांबरी उद्योग समूहाच्या सर्व कार्यालयांमध्ये कामाचा आरंभ नियमित मारुतिस्तोत्र म्हणून आणि प्रार्थना करून होतो. ‘मारुतिस्तोत्र मुखोद्गत असल्यास ते भावपूर्ण आणि एकाग्रतेने म्हटले जाते अन् त्याचा त्या व्यक्तीला अधिक लाभ होऊ शकतो’, असा डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा दृष्टीकोन आहे.

४. ‘पितांबरी उद्योग समूहाशी जोडलेल्या सर्वांची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्न करणे

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी ‘स्टॉकिस्ट’ (वितरक, माल साठवणारा), घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, उद्योगातील पदाधिकारी, सहकारी वर्ग आदी अनेक जणांना  पितांबरी उद्योग समूहाशी जोडून ठेवले आहे. डॉ. प्रभुदेसाई हे ‘स्वत:ला साधनेमुळे होणारा लाभ आणि स्वतःच्या जीवनात झालेले परिवर्तन’ यांविषयी सर्वांना आवर्जून सांगतात. ‘सर्वांनी साधना करावी आणि धर्मकार्यात योगदान द्यावे’, यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.

५. ‘उद्योजकांनी साधना करावी’, अशी तळमळ असणे

श्री. सागर चोपदार

उद्योजकांच्या बैठकीत शक्यतो व्यावसायिक मार्गदर्शन केले जाते. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई या बैठकीत मार्गदर्शन करतांना ‘व्यवसायाचा केंद्रबिंदू ‘साधना’ हाच आहे’, असे उद्योजक आणि युवक यांना समजावून सांगतात. उद्योजकांना याचा मोठा लाभ होतो. डॉ. प्रभुदेसाई ज्या ज्या भागात जातात, तेथे मार्गदर्शनाद्वारे उद्योजकांमध्ये अध्यात्माचा प्रसार करतात. ‘उद्योजकांनी साधना करावी’, अशी त्यांची तळमळ असते.

६. नवउद्योजकांना मार्गदर्शन करणे

६ अ. नवउद्योजकांसाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई हे नवीन उद्योजकांसाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. ‘मराठी उद्योजक घडावेत, त्यांनी उद्योगक्षेत्रात यश संपादन करावे’, यांसाठी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई सर्वतोपरी प्रयत्न करतात. अनेक उद्योजकांनी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केलेल्या मार्गदर्शनाविषयी त्यांचे आभार मानले आहेत.

६ आ. नवउद्योजकांना गुरुकृपायोगानुसार साधना करण्याचे महत्त्व सांगणे : ‘मराठी उद्योजक घडावेत’, यासाठी ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ हे एक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र राज्यातील सहस्रावधी नवउद्योजक त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यांना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई साधना सांगतात. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई मार्गदर्शनात सांगतात, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा शीघ्र आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे.’’

६ इ. ‘साधना करणे’ हाच व्यावसायिक यशाचा केंद्रबिंदू आहे’, असे सांगणे : ‘साधना उतारवयात करायची असते’, असा अपसमज समाजात मोठ्या प्रमाणात दृढ झाला आहे. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनामुळे साधना करण्याचे महत्त्व युवा उद्योजकांच्या लक्षात येत आहे. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई स्वानुभवाद्वारे उद्योजकांना सांगतात, ‘‘उद्योगामध्ये अपयश आले, तरीही त्यावर मात करण्याचे बळ साधनेमुळेच प्राप्त होते. साधनेमुळे स्थिरता प्राप्त होते आणि कार्याला भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो. उद्योगातील यशाचा केंद्रबिंदू साधना हाच आहे.’’ ते ‘उद्योग आणि साधना यांची सांगड कशी घालावी ?’, यांविषयी उद्योजकांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे उद्योजकांना साधना करण्याची प्रेरणा मिळते. डॉ. रवींद्र प्रभुदेसाई ज्या भागात जातात, तेथे उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतात.

७. अर्पणाचे महत्त्व ज्ञात असल्याने परिचितांना अर्पण करायला प्रवृत्त करणे

भगवंताच्या कार्यासाठी अर्पण केल्यामुळे होणारा लाभ त्यांनी स्वतः अनुभवला आहे. त्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पितांबरी उद्योगसमूहातील त्यांचे सहकारी, पितांबरीशी जोडलेले व्यापारी, दुकानदार यांनाही अर्पण करण्याचे आवाहन करतात.

८. पितांबरी उद्योग समूहाकडून प्रकाशित केली जाणारी आणि ‘राष्ट्र अन् धर्म’ यांचे हित जोपासणारी वार्षिक दैनंदिनी !

पितांबरी उद्योग समूहाकडून प्रतिवर्षी अत्यंत कल्पक अशी ‘डायरी’ (दैनंदिनी) प्रकाशित केली जाते. याची संकल्पना डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची असते. या दैनंदिनीतील विषय पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण असतात. वर्ष २०२६-२७ या वर्षीचा दैनंदिनीचा विषय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित होता. दैनंदिनीत शिवरायांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली होती. यात शिवरायांचे चरित्र, त्यांची राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती निष्ठा, गडकिल्ले, असे अनेक विषय अंतर्भूत होते. दैनंदिनीत राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील विषय अंतर्भूत असतात. सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले अध्यात्मविषयक मार्गदर्शनही प्रतिवर्षी दैनंदिनीत प्रसिद्ध केले जाते.’

– श्री. सागर चोपदार, नवीन पनवेल (२४.७.२०२६) ०