प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी कुणाचीही सुटका होणार नाही ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – प्रश्नपत्रिका फुटणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे; मात्र या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने योग्य पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात लोकसभेत नवीन कठोर विधेयक आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या गुन्ह्यातून कुणाचीही सुटका होणार नाही आणि प्रश्नपत्रिका फुटीवर कडक कारवाई होईलच, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या भावना आणि देश यांच्या भवितव्याला पंतप्रधानांनी प्राधान्य दिले, तसेच नैतिक दायित्व स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र दिले. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे बिगर राजकीय होते; मात्र काही राजकीय लोकांनी स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या. काही लोक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे आंदोलन करत जात होते, याचा अर्थ पंतप्रधानांच्या घरी घातपात घडवण्याचाच त्यांचा हेतू होता. राहुल गांधी इतरांना ‘इकडे या’ म्हणून चिथावणी देत होते. आंदोलन जंतरमंतरवर चालू असतांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी का बोलावले  ? अराजकता पसरवणे हाच विरोधी पक्षनेत्याचा हेतू होता. मी याचा तीव्र निषेध करतो. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या असून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे उज्जवल भवितव्य घडवावे, असे शिंदे या वेळी म्हणाले.