नागपूर येथे अल्पवयीन मुलीचे धर्मांतर आणि निकाह !

४ मुसलमानांवर गुन्हा नोंद

नागपूर – येथील मानकापूर येथे बळजोरीने एका अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करण्यात आले. ४ वर्षांपूर्वी तिचे अपहरण करून तिची बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यात आली आणि मदरशात निकाह करण्यात आला होता. त्या वेळी ती १६ वर्षांची होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कथित पतीसह चौघांविरोधात अपहरण, बलात्कार, बालविवाह, बनावट माहिती गोळा करणे, तसेच मारहाण, बळजोरीने धर्मांतर या प्रकरणी मुख्य आरोपी समीर मुनीर अली (वय २४ वर्षे), तसेच अझीझा मुनीर अली, मुनीर अली आणि एका मौलवीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

१. तक्रारदार तरुणी सध्या २१ वर्षांची आहे. समीरने वारंवार केलेल्या शरीरसंबंधामुळे ती गर्भवती झाली. तिला ४ वर्षांचा मुलगा आहे.

२. समीरने तिचे खोटे आधारकार्ड बनवून ती सज्ञान असल्याचे दाखवण्यासाठी तिचे वय वाढवले. बनावट ओळखपत्राचा वापर करून समीरने तिला मदरशात नेले. तिथे अझीझा मुनीर अली (वय ४५ वर्षे) आणि मुनीर अली (वय ५० वर्षे) यांच्या उपस्थितीत मौलवीने निकाह लावला. तिच्यावर धर्मांतराची बळजोरी केली. समीर, अझीझा आणि मुनीर अली यांनी तिला वारंवार मारहाण केली.

संपादकीय भूमिका

  अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्याविना या प्रकारांना आळा बसणार नाही !