गुरुस्तवन भावांजली

  • २९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने...

  • गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुक्तीस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

गुरु मुक्तीचें मंडन । गुरु दुष्टाचें दंडन ।

गुरु पापाचें खंडन । नानापरी वारितसे ।।

अर्थ : गुरु म्हणजे मोक्षाची शोभा आहे. तो दुष्टांचे दंडन (दुष्टांना शिक्षा) करणारा आहे, तसेच तो मुमुक्षूच्या अनेक पातकांची अनेक प्रकारांनी निवृत्ती करतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्री गुरु हे केवळ मुक्ती देणारेच नसतात, तर ते स्वतः मुक्तीचे भूषण (मंडन) असतात. मोक्ष किंवा मुक्ती ही अवस्था श्री गुरूंमुळेच सुशोभित होते. ‘साधकाला मायेच्या बंधनातून सोडवून त्याला निरामय आनंदाची प्रचीती देणे’, हे श्री गुरूंचे मुख्य कार्य आहे. अनेक जन्मांतील पापांमुळे मानवाचे चित्त मलिन झालेले असते.

श्री गुरु आपल्या साधकाला संकटातून आणि पापकर्माच्या फळातून वाचवण्यासाठी विविध मार्ग अवलंबतात. श्री गुरु आपल्या कृपाप्रसादाने साधकाच्या मनातील दुष्ट प्रवृत्तींचे दंडन (दमन) करतात आणि त्याला सन्मार्गाला लावतात.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून त्यांच्या कुविचारांचे (अयोग्य विचारांचे) दंडन (दमन) करत आहेत अन् त्यांना षड्रिपूंच्या दास्यत्वातून मुक्त करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेमुळे साधकांच्या प्रारब्धाचा भार हलका होत आहे. साधकाच्या जीवनातील संकटे दूर करून त्याला आध्यात्मिक बळ देण्याचे कार्य गुरुदेव सातत्याने करत आहेत. अशा मुक्तीस्वरूप श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी नमन !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.७.२०२६) ॐ