११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद

रत्नागिरी जिल्हा पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर कारवाई

(म्युल बँक खाते : सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करून मिळवलेले पैसे थेट स्वतःच्या बँक खात्यात न घेता, दुसर्‍याच एखाद्या व्यक्तीच्या खात्यात जमा करतात, ते खाते)

रत्नागिरी – राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र सायबर, मुंबई’ यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई करत सायबर फसवणुकीत वापरण्यात आलेल्या ११ म्युल अकाऊंटधारकांवर (गुन्ह्यासाठी भाड्याने वापरलेली बँक खाती) ११ स्वतंत्र गुन्हे नोंद केले आहेत. याशिवाय आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींचा वेगाने अन्वेषण करून पीडित नागरिकांना लाखो रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश आले आहे.

महाराष्ट्र सायबरकडून सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या पहिल्या टप्प्यातील (Layer-1) बँक खाती, ए.टी.एम्. आयडी, धनादेशाद्वारे (चेक) पैसे काढण्याची माहिती, सिमकार्ड तपशील, तसेच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील (NCCRP) माहिती रत्नागिरी जिल्हा पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली होती. या माहितीचे सखोल विश्लेषण करून पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत भाड्याने बँक खाती देणारे (म्युल अकाऊंटधारक), सिमकार्ड वापरकर्ते, एजंट, मध्यस्थ आणि इतर संबंधितांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते.

जानेवारी २०२६ पासून NCCRP मार्फत प्राप्त ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या २१ तक्रारींपैकी १४ तक्रारींमध्ये प्रथम दर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवण्यात आला आहे. याशिवाय मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) अंतर्गत नोंद झालेल्या १०३ व्यवहारांपैकी ६८ व्यवहारांमध्ये यशस्वी हस्तक्षेप करून एकूण ३,६०,७८४.५२ रुपयांपैकी २,४२,५९७.४१ रुपये पीडितांना परत मिळवून देण्यात आले. तसेच ग्रिव्हन्स रिड्रेसल मॉड्यूल (GRM) अंतर्गत प्राप्त झालेल्या १२ पैकी सर्व १२ तक्रारींचे यशस्वी निवारण (निचरा) करण्यात आले आहे.

पोलिसांचे आवाहन

सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या बनावट खात्यांचे जाळे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष अन्वेषण चालू असून अशा गुन्हेगारी ‘नेटवर्क’विरोधात कठोर कारवाई सातत्याने चालू राहील. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते, ए.टी.एम्. कार्ड, चेकबुक, मोबाईल सिमकार्ड किंवा इंटरनेट बँकिंगची सुविधा वापरण्यास देऊ नये, तसेच ओटीपी (OTP) कुणालाही सांगू नये. कमिशन किंवा पैशांच्या आमिषाला बळी पडून बँक खाते अथवा सिमकार्ड इतरांच्या वापरासाठी उपलब्ध करून देणे, हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केले आहे.