वारकर्‍यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्‍यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

वारकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘भव्य वारकरी महाअधिवेशन’ !

डावीकडून श्री. दत्तात्रय पिसे, ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने (शास्त्री), श्री. सुनील घनवट आणि श्री. प्रसाद पंडित

सोलापूर – वारकरी संप्रदाय गेली अनेक शतके समाजाला नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आहे. आजही हा संप्रदाय धर्म आणि राष्ट्रहित यांसाठी अविरत कार्यरत आहे. याच भूमिकेतून वारकरी ऐक्य साधण्यासाठी आणि शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरण्यासाठी आषाढी एकादशीच्या (२५ जुलै) पावन पर्वावर पंढरपूर येथे एक दिवसीय भव्य ‘वारकरी महाअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. पंढरपूर आणि आळंदी येथे वर्ष २००८ पासून अशा प्रकारचे अधिवेशन चालू असून या महाअधिवेशनात हिंदुत्वासाठी कार्य करणारे ह.भ.प. (हरि भक्त परायण) आणि पूजनीय संतांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल. धर्मरक्षणासाठी झटणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संतांचा या वेळी जाहीर सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सोलापूर येथील ‘श्रमिक पत्रकार संघा’त झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने (शास्त्री), राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर, ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’चे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

हे महाअधिवेशन दिनांक २५ जुलै या दिवशी (आषाढी एकादशी) दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत पंढरपूर येथील भक्तीमार्ग, ‘जनकल्याण हॉस्पिटल’च्या शेजारी असलेल्या ‘सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठा’त होईल. या महाअधिवेशनाचे अध्यक्षस्थान आचार्य पूज्यपाद श्री १००८ दंडी स्वामी अमृताश्रम महाराज भूषवणार असून सरला बेट, श्री क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांचे मार्गदर्शन या अधिवेशनाला लाभणार आहे.

विविध संत, मान्यवर, कीर्तनकार यांची उपस्थिती !

या महाअधिवेशनात ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र राज्यवारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वरशास्त्री महाराज आणि सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान’चे (पंढरपूर) विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान’चे विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान’ (आळंदी)चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, ‘अखिल भारतीय संत समिती’चे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज मार्गदर्शन करतील. शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. अक्षय महाराज भोसले, भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशप्रमुख श्री. तुषार भोसले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह अनेक मान्यवर संत, महंत, धर्माचार्य आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुखही आपापले विचार मांडणार आहेत.

महाअधिवेशनात वारकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार !

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच या तीर्थक्षेत्रांच्या १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी घालावी, या प्रमुख मागण्या असतील. याखेरीज संत वाङमय, राष्ट्रपुरुष, धर्म आणि देवत यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ‘ईशनिंदा प्रतिबंधक कायदा’ लागू करावा आणि संतांच्या श्लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा. नक्षलवाद्यांचे समर्थन करणार्‍या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’सारख्या संघटनांना, तसेच नास्तिक आणि पुरोगाम्यांना वारीत येण्यास प्रतिबंध करावा अन् ‘अंनिस’च्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी तात्काळ प्रशासक नेमावा. वारकरी शिक्षण संस्था आणि वेद पाठशाळांना मासिक अनुदान द्यावे, चंद्रभागा अन् इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण त्वरित रोखावे आणि ‘वक्फ बोर्डा’ने हडपलेल्या मंदिरांच्या भूमी परत मिळवण्यासाठी शासनाने त्वरित निर्देश द्यावेत, अशा महत्त्वपूर्ण मागण्या या वेळी शासनाकडे केल्या जातील.

प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ कायमस्वरूपी रहित करा !

पुरातत्त्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या धर्मविरोधी निर्णयाविरुद्ध वारकरी आणि मंदिर महासंघ यांनी दिलेल्या लढ्याविषयी या महाअधिवेशनात चर्चा केली जाईल. प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ कायमस्वरूपी रहित करून देवभूमीचे रक्षण करणारा ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी हडप प्रतिबंधक कायदा) लागू झाला पाहिजे, असा महत्त्वाचा ठरावही मांडण्यात येईल. समस्त वारकरी आणि भाविक यांनी या ऐतिहासिक महाअधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी श्री. विनोद रसाळ (संपर्क क्र. ९९७५५९२८९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.