इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेकडून इराणमधील ४ प्रांतांवर आक्रमण

डॉनल्ड ट्रम्प

तेहरान (इराण) – इराणची अवस्था अत्यंत वाईट आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इराणवरील आक्रमणाविषयी माहिती दिली.

अमेरिकेने सलग १२ व्या दिवशी, म्हणजे २२ जुलैला इराणवर आक्रमण केले. या वेळी अमेरिकेने इराणमधील खुजेस्तान, बुशेहर, होर्मोजगान आणि इलाम या प्रांतांमध्ये अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रे आणि हवाई आक्रमण केले. इराणी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणमधील अनेक सैनिकी तळ आणि सामरिक ठिकाणे यांना लक्ष्य करण्यात आले.

येमेनमधील हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या तेलवाहू नौकांवर आक्रमण

दुसरीकडे येमेनमधील हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या ‘एन्सेलिया’ आणि ‘लैला’ या तेलवाहू नौकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांद्वारे आक्रमण केले. सौदी अरेबियानेही हे आक्रमण झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. हुथी बंडखोरांनी सर्व नौकांना सौदी अरेबियातील बंदरांपासून दूर रहाण्याची चेतावणी दिली आहे. हुथी बंडखोरांच्या या कृतीमुळे बाब-अल्-मंदेब सामुद्रधुनीमध्ये (दोन जलाशयांना जोडणार्‍या जलमार्गामध्ये) तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

…तर इराणवर बाँबफेक करू ! – ट्रम्प

इराणने जर हॉर्मुझ सामुद्रधुनीतील कोणत्याही नौकेवर आक्रमण केले, तर अमेरिका इराणमधील पूल आणि वीज केंद्रे यांवर बाँबफेक करील. यात तेहरानमधील ठिकाणांचाही समावेश असेल, अशी चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे.