समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२६ मध्ये चि. अच्युत बंकापूर याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक)

चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. वय २ ते ३ वर्षे

१ अ. उत्तम स्मरणशक्ती

१. ‘चि. अच्युतला हनुमानचालीसा, मारुतिस्तोत्र, श्री गणपतिस्तोत्र, देवीस्तोत्र आणि इतर श्लोकही पाठ आहेत. तो कधी कधी खेळत असतांनाही ते म्हणतो.

२. बाहेरून काही साहित्य आणायचे असल्यास तो ते लक्षात ठेवतो आणि आईला त्याची आठवण करून देतो.’

– श्री. स्वयंप्रकाश बंकापूर (चि. अच्युतचे वडील), थेरगाव, चिंचवड, पुणे.

सौ. अमू्‌ल्‍या बंकापूर

१ आ. प्रेमळ

१. ‘आमच्या घरी कुणी आल्यावर अच्युत त्यांना स्वतःहून ‘पाणी हवे का ?’, असे विचारतो आणि लगेच पाणी आणून देतो.

२. त्याचे बाबा काम करत असतांना जेवणाची वेळ झाल्यास तो त्यांना ‘तुम्ही आधी जेवून घ्या’, असे सांगून त्यांना जेवणाची आठवण करून देतो.

३. आम्हा दोघांना बरे वाटत नसल्यास तो आम्हाला औषधे घेण्याची आठवण करतो.’

– सौ. अमूल्या बंकापूर (चि. अच्युतची आई), थेरगाव, चिंचवड, पुणे.

१ इ. देवाची आवड

१. ‘अच्युत प्रतिदिन संध्याकाळी देवापुढे बसून ‘शुभं करोती’ आणि सर्व स्तोत्रे म्हणतो.’ – सौ. अमूल्या बंकापूर

२. ‘मी अथवा माझे वडील देवघरात पूजेला बसल्यावर अच्युत आमच्या समवेत पूजेला बसतो. तो ‘देवांना स्नान घालणे, गंध-फुले वहाणे’, हे आवडीने करतो.

३. त्याने जेवणापूर्वी आणि रात्री झोपतांना म्हणायचा मंत्र त्याच्या मोठ्या काकूकडून शिकून घेतला. तो प्रतिदिन रात्री मंत्र म्हणून आणि नामजप करून झोपतो.’

– श्री. स्वयंप्रकाश बंकापूर

१ ई. आईला घरकामांत साहाय्य करणे : ‘अच्युत मला ‘झाडांना पाणी घालणे, कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या जमतील तशा घड्या घालणे, भांडी लावणे, प्रतिदिन रात्री खेळणी आवरून ठेवणे’, अशा कामांत स्वतःहून साहाय्य करतो.

१ उ. सात्त्विकतेची ओढ

१ उ १. सात्त्विक खेळ खेळणे : अच्युत आमच्याशी (मी आणि त्याचे बाबा यांच्याशी) ‘हनुमान आणि अंजनीमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता, गणपति आणि पार्वतीमाता, शिव’, असे खेळ खेळतो. तो त्याच्या मैत्रिणीसह रामसेतू बनवण्याचा खेळ खेळतो, तसेच तो धनुष्य-बाण आणि गदा घेऊन खेळतो.

१ उ २. शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बनवणे : गणेशोत्सवात शाळेतील सर्व मुलांना शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बनवण्यास शिकवली होती. अच्युतने त्याच्या आजी-आजोबांच्या साहाय्याने गणपतीची मूर्ती बनवली. त्याने घरच्या गणेशोत्सवात त्या मूर्तीची पूजा केली आणि तिचे विसर्जनही केले. हे सर्व करतांना त्याला आनंद होत होता.

१ उ ३. त्याला सात्त्विक संगीत, तसेच सात्त्विक वाद्ये (तबला, ढोल वाजवणे) यांची आवड आहे.

१ उ ४. तो नियमितपणे बालसंस्कारवर्गाला जातो.

१ उ ५. त्याला श्री गणपति, रामायण, महाभारत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा असलेली पुस्तके पहायला आवडतात. तो त्यांतील कथा समजून घेतो.

१ ऊ. अच्युत शाळेत जातांना नियमित टिळा लावतो. त्याच्या शाळेतल्या शिक्षिका म्हणतात, ‘‘टिळा लावल्यावर त्याच्याकडे पाहून छान वाटते.’’

– सौ. अमूल्या बंकापूर


चि. अच्युत बंकापूर (वय ४ वर्षे) याची पू. (सौ.) मनीषा पाठक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. ‘चि. अच्युत नेहमी उत्साही आणि आनंदी असतो.

२. त्याला सात्त्विक गोष्टींची आवड आहे.

३. तो ४ वर्षांचा असूनही त्याच्या २ वर्षांच्या लहान बहिणीची अत्यंत प्रेमाने काळजी घेतो. त्यातून त्याचा प्रेमळ स्वभाव आणि प्रगल्भता लक्षात येते.’

– पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे) (५.७.२०२६)

२. वय ३ ते ४ वर्षे

२ अ. समंजस

१. ‘अच्युतला आणि अभिरामीला (बहिणीला) खेळणी आवरून ठेवायला सांगितली, तर अच्युत म्हणतो, ‘‘ती लहान आहे. मी आवरतो’’ आणि तो सर्व पसारा आवरून ठेवतो. जेव्हा मी काही कामांत असेन, तेव्हा तो अभिरामीकडे लक्ष ठेवतो.

२. त्याने कधीही कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला आणि मी त्याला ‘नंतर घेऊया’, असे सांगितले, तर तो लगेच ऐकतो.

२ आ. अच्युत गाडीवरून जातांना सर्वप्रथम श्रीराम आणि हनुमंत यांचा जयघोष करतो.

२ इ. अच्युतला त्याच्या चुका लक्षात आणून दिल्यावर तो लगेच क्षमा मागतो.’

– श्री. स्वयंप्रकाश बंकापूर

३. स्वभावदोष : ‘राग येणे आणि आळस’ – सौ. अमूल्या बंकापूर (२०.४.२०२६)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.