गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला ! 

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.  (लेखांक २३) 

‘मागच्या लेखात आपण ‘गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील ‘सत्सेवे’च्या माध्यमातून साधक-कलाकाराची शीघ्र उन्नती कशी होऊ शकते ? तसेच सत्सेवेमुळे कला-उपासकाची वृत्ती सात्त्विक आणि व्यापक कशी होत जाते ?’, हे पाहिले. 

गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेतील एक अंग ‘त्याग’ हे आहे. ‘त्याग’ म्हटले की, आपल्याला अकस्मात् थोडीशी भीती वाटते. ‘साधनेमध्ये आपल्याला सगळेच सोडावे लागणार कि काय ?’, असा विचार काहींच्या मनात येऊ शकतो; परंतु साधक-कलाकार साधनेत पुढे पुढे जाऊ लागल्यावर त्याग हा टप्पा त्याला सहजपणे जमू लागतो. साधकाची स्थिती आणि क्षमता यांनुसार तो तन, मन, धन इत्यादींचा त्याग करण्यास आरंभ करतो. ‘त्याग म्हणजे नेमके काय ? आध्यात्मिक दृष्टीने साधक-कलाकारासाठी त्यागाचे महत्त्व काय ?’, यांविषयीचे विवेचन आपण आजच्या लेखात पहाणार आहोत.                                   (भाग १)


१. त्याग म्हणजे काय ? 

‘त्याग’ म्हणजे सत्साठी (ईश्वरप्राप्तीसाठी) अपेक्षारहित भावाने मायेची आसक्ती न्यून करणे. काही जणांना वाटते, ‘काही वस्तूंचा उपयोग न करणे, वस्तू इतरांना देऊन टाकणे इत्यादी म्हणजेच त्याग’; परंतु त्यागाचा अर्थ एवढ्यापुरता मर्यादित नाही. त्यागाचे स्वरूप व्यापक आहे. त्यागामध्ये सर्व भौतिक गोष्टींच्या संदर्भातील आसक्ती सुटणे महत्त्वाचे असते. आसक्ती हेच मनुष्याच्या दु:खाचे मूळ कारण आहे. ‘साधक-कलाकाराची आसक्ती न्यून होत जाणे’, हे त्यागामुळे त्याला सहज शक्य होते. साधना वाढत गेल्यावर साधक-कलाकाराचा तन, मन, धन आणि अन्य भौतिक गोष्टी यांचा त्याग सहजतेने होऊ लागतो.

१ अ. कलाकारासाठी त्यागाची व्याख्या : कलाकारासाठी ‘त्याग’ म्हणजे प्रतिभेपेक्षा (‘कलेतील प्रभुत्व’ किंवा ‘कला जाणण्यातील कर्तेपणा’ यांपेक्षा) साधनेला आणि यशापेक्षा समर्पणभावाला (‘कला ही ईश्वराची देण आहे’, या भावाला) अधिक महत्त्व देणे होय.

२. त्यागाचे महत्त्व 

भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही वरचे स्थान देण्यात आले आहे. ‘गुरु’ म्हणजे केवळ ज्ञानाचे भांडार नाही, तर शिष्याचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून त्याला आत्मज्ञानाचा प्रकाश दाखवणारा दीप आहे. साधनेत पुढे जाण्यासाठी साधकाने सद्गुरुचरणी सर्वस्वाचा त्याग करणे आवश्यक असते, म्हणजे तन, मन, धन, बुद्धी आणि प्राण यांसह कर्तेपणा (अहंकार), असे सर्वच अर्पण करायचे असते. यालाच भारतीय परंपरेत संपूर्ण शरणागती किंवा आत्मसमर्पण म्हणतात. खरे म्हणजे गुरूंना यांतील काहीही नको असते; परंतु ‘शिष्याची आसक्ती न्यून होऊन त्याने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जलद मार्गक्रमण करावे’, हीच श्री गुरूंची इच्छा असते. त्यासाठी ते ‘त्यागा’च्या माध्यमातून शिष्याची आसक्ती न्यून करून घेतात.

२ अ. कलाकाराच्या दृष्टीने त्यागाचे महत्त्व : मनुष्याच्या मनात सतत नवीन इच्छा निर्माण होत असतात; पण ‘त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच’, असे नसते. त्याची एखादी इच्छा पूर्ण झाली की, त्याच्या मनात पुढील नवीन इच्छा जन्म घेते आणि तो ती पूर्ण करण्यासाठी धडपडू लागतो.

एखाद्या कलाकाराला एक पुरस्कार मिळाला की, त्याच्या मनात पुढच्या पुरस्काराची इच्छा निर्माण होते. एका गोष्टीत यश मिळाल्यास ‘त्याहून मोठे यश मिळावे’, असे त्याला वाटते. त्यामुळे कलाकाराचे मन कधीच पूर्णपणे समाधानी होत नाही. हा असमाधानीपणाच त्याच्या दुःखाचे कारण ठरते.

जेव्हा कलाकाराच्या मनातील इच्छांचे प्रमाण न्यून होत जाते आणि तो इच्छांचा (पैसा, प्रसिद्धी, यश इत्यादींचा) त्याग करू लागतो, तेव्हा त्याच्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून होत जाते. मनातील विचार न्यून झाल्यामुळे त्याच्या आनंदात वाढ होऊ लागते. या स्थितीमध्ये साधक-कलाकाराचे बाह्यांगाकडे पहाणे न्यून होऊन त्याला कलेतील आनंद आणि भगवंत अनुभवता येऊ लागतो; म्हणूनच मनुस्मृतीत म्हटले आहे, ‘प्रापणात् सर्वकामानां परित्यागो विशिष्यते ।’, म्हणजे ‘सर्व कामनांच्या प्राप्तीपेक्षा त्यांच्या त्यागात आनंद आहे.’ मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्याने त्याला जेवढा आनंद मिळतो, त्यापेक्षा सर्व इच्छांचा त्याग केल्याने त्याला अधिक आनंद मिळतो.

३. ‘दान’ आणि ‘त्याग’ यांतील भेद 

श्री. मनोज सहस्रबुद्धे

३ अ. अपेक्षा ठेवून दान केल्याने समाधान आणि आनंद न मिळता दुःख मिळते ! : सर्वसाधारणपणे ‘दान’ देतांना आपण आपल्याकडे अधिक भाग ठेवून आपल्याकडील थोडासा भाग दान करतो, उदा. आपल्याकडे १,००० रुपये असतील, तर त्यांतील १० रुपये देण्याचा विचार आपल्या मनात असतो. दान घेतलेल्या व्यक्तीने आपल्याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, तर आपल्याला त्याचा राग येतो. दान केलेल्या गोष्टीचा विनियोग दान घेणार्‍याने योग्य पद्धतीने केला नाही, तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो. ‘मी दान केले’, हा कर्तेपणाचा विचार आपल्या मनात कार्यरत असतो. एकंदरीत दानामागे भावनिक विचार अधिक असतो.

कला क्षेत्रातील दानाचे उदाहरण, म्हणजे एखादे संगीत संमेलन किंवा संगीत महाविद्यालय यांसाठी दान देणे. यामध्ये आयोजकांनी दात्याचा मान-सन्मान केला नाही, तर दात्याला वाईट वाटू शकते. दानामागे दात्याची अपेक्षा कार्यरत असल्याने त्यातून त्याला समाधान आणि आनंद न मिळता दु:खच मिळते.

३ आ. त्याग हा ‘स्व’ला विसरण्यासाठी असल्याने त्यागातच खरा आनंद असतो ! : ‘त्याग’ म्हणजे ‘माझे काहीच नाही. सर्व भगवंताचे किंवा गुरूंचे आहे’, या भावापोटी अर्पण करणे. त्याग करतांना मनुष्याच्या मनात ‘दुसर्‍याला दिल्यावर स्वतःकडे किती शेष रहाते ?’, हा विचार नसतो. त्याग ‘स्व’ला विसरण्यासाठी असतो. त्यागाला श्रद्धा आणि भाव यांची जोड असल्याने त्यातून निराशा किंवा दुःख होत नाही. ‘त्यागातच खरा आनंद लपलेला आहे’, असे अनेक संतांनीही सांगितले आहे. संत मीराबाई स्वतः राजघराण्यातील असून त्यांनी भगवंतासाठी सर्व सुखांचा आणि घरादाराचा त्याग केला होता. त्यामुळेच साक्षात् भगवान श्रीकृष्णाने त्यांना आपलेसे केले. संत मीराबाईंनी सर्व वैभवाचा त्याग करूनच खर्‍या सत्-चित्-आनंदाची प्राप्ती करून घेतली होती.

४. त्याग करण्याची माध्यमे 

साधनेत साधकाला भगवंत किंवा गुरु यांना सर्वस्व अर्पण करायचे असते. हे एकदम करणे शक्य नसते. साधना वाढली की, हळूहळू साधकाची आसक्ती न्यून होऊ लागते आणि त्याच्या नकळत त्याग होण्यास आरंभ होतो. त्यामुळे साधक-कलाकार आपली साधना म्हणून स्वतःच्या क्षमतेनुसार तन, मन, धन, बुद्धी, वेळ इत्यादींचा त्याग करू शकतो. भगवंत ‘साधकाकडे जे नाही’, ते कधीच मागत नाही. एखाद्याकडे धन नसेल, तर तो धनाचा त्याग करण्याऐवजी त्याच्याकडे असलेले तन आणि मन यांचा त्याग करू शकतो.

४ अ. तन : साधकाने ईश्वरी कार्यासाठी शारीरिक सेवा करून तन अर्पण करावे.

४ आ. मन : साधकाने सतत नामजप करण्याचा प्रयत्न करावा. त्याने मनात येणारे स्वतःविषयीचे आणि मायेचे विचार यांचा त्याग करावा. त्याने मायेतील विचारांऐवजी भगवंत किंवा गुरु यांच्याविषयीचे विचार, म्हणजेच सत्च्या विचारांमध्ये रहावे.

४ इ. धन : साधकाने सत्साठी धनाचा त्याग आपल्या क्षमतेनुसार नियमितपणे किंवा प्रासंगिक करावा.

४ ई. बुद्धी : साधक स्वतःतील कलागुण आणि कौशल्य यांचा उपयोग ईश्वरी कार्यासाठी करू शकतो.

४ उ. वेळ : स्वतःसाठी वापरण्यात येणार्‍या वेळेतील काही भाग ईश्वरी कार्य आणि ईश्वराची सेवा यांसाठी वापरावा.

‘साधक-कलाकार तन, मन, धन, वेळ, बुद्धी इत्यादींच्या माध्यमातून त्याग कशा प्रकारे करू शकतो ? आणि त्याग केल्यामुळे साधकाला काय लाभ होतो ?’, याचे विस्तृत विवेचन आपण या लेखाच्या पुढील भागात पहाणार आहोत.’                    (क्रमशः)

– श्री. मनोज मुकुंद सहस्रबुद्धे, वाद्य-अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.७.२०२६)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. – संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. मनोज सहस्रबुद्धे

संपर्क क्रमांक : ८७९३६ ७८१७८

ई-मेल : [email protected]