अणुरेणुयां थोकडा । तुका आकाशाएवढा ।। १ ।।
गिळुनि सांडिलें कलेवर । भव भ्रमाचा आकार ।। ध्रु.।।
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ।। २ ।।
तुका म्हणे आतां । उरलों उपकारापुरता ।। ३ ।।
मी अणूरेणूपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशाएवढा मोठा आहे. मी भ्रमरूपी आकार सर्व गिळून टाकला आहे. त्रिपुटी मी सांडली आहे आणि अंतःकरण रूप घाटाच्या ठिकाणी निजबोधाचा दीप प्रकाशित केला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता मी केवळ लोकांवर उपकार करण्यासाठी उरलो आहे.’
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ‘अणुरेणुयां थोकडा’ हा अभंग, म्हणजे केवळ मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट रचना नसून तो वेदांत तत्त्वज्ञान आणि विशेषतः ‘अद्वैत’ सिद्धांत यांचा एक जिवंत अनुभव आहे. या अभंगात संत तुकोबा ज्या स्थितीचे वर्णन करतात, ती स्थिती वाचल्यावर अद्वैत वेदांतच आत्मसाक्षात्कारातून प्रकटू लागल्याचे दिसते. ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।’ (ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १६४, ऋचा ४६), म्हणजे ‘एकच सत्तत्त्व (ईश्वर) आहे. त्या एकच सत्तत्त्वाला ज्ञानीजन पुष्कळ प्रकारची नावे देतात.’ या न्यायाने या सर्वांचा मेळ घालून संत तुकोबांच्या या वैश्विक रूपाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

१. संत तुकोबांची ‘आकाशाएवढी’ व्याप्ती वैश्विक एकात्मतेची ग्वाही
संत तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की, ‘मी अणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठा आहे’, तेव्हा ते प्रत्यक्षात उपनिषदांमधील ‘अणोरणीयान् महतो महीयान्’ या सूत्राचेच प्रतिपादन तर करत असतात ! आद्यशंकराचार्यांनी मांडलेल्या अद्वैत वेदांतानुसार ‘ब्रह्म’ हेच सत्य असून जीव आणि ब्रह्म यांमध्ये मुळात कोणताही भेद नाही.
‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः ।’, म्हणजे ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य असून जग मिथ्या आहे. जीव हा ब्रह्मच आहे, दुसरे काही नाही.’
संत तुकोबांनी त्यांच्या भक्तीच्या बळावर हा ‘अहं ब्रह्मास्मि’ (मीच ब्रह्म आहे), या महावाक्याचा अनुभव प्रत्यक्ष प्राप्त केला आहे. संत तुकोबांची ‘आकाशाएवढी’ व्याप्ती ही याच वैश्विक एकात्मतेची ग्वाही देते. जेव्हा व्यक्तीचा ‘मी’पणा किंवा अहंकार गळून पडतो, तेव्हा ती व्यक्ती मर्यादित शरिरात न रहाता संपूर्ण चराचरात विस्तारते.
२. मूळ तत्त्व हस्तगत करणारे संत तुकाराम महाराज !

या प्रक्रियेत संत तुकोबांनी ‘कलेवर’, म्हणजे देहाचा मोह आणि ‘भवभ्रम’, म्हणजे संसाराचा आभास पूर्णपणे गिळला आहे, असे ते म्हणतात. अद्वैताच्या भाषेत सांगायचे, तर हा ‘माया’ नावाच्या पडद्याचा नाशच म्हटला पाहिजे. दोरीवर भासणारा सर्प जसा ज्ञानामुळे नष्ट होतो, तसाच संत तुकोबांना या जगाचा भास आता सत्य वाटेनासा झाला आहे. ‘पिंड’ आणि ‘ब्रह्मांड’ यांतील अंतर संत तुकोबांनी प्रत्यक्ष अनुभूतीने पार केले आहे. त्यांनी जगाच्या बाह्य आकाराला बाजूला सारून त्यातील मूळ तत्त्व हस्तगत केले आहे. स्वतःच्या साधनेच्या बळावर सामान्य माणसाला फार मोठ्या वाटतील, अशा मर्यादा सारेच संत अत्यंत लीलया पार करून गेलेले दिसतात. संत तुकोबारायही याला अपवाद नाहीत.
३. संत तुकोबांचे ‘शुद्ध चैतन्य’ जागृत होणे
‘सांडिली त्रिपुटी’, असे संत तुकोबाराय याच अभंगात म्हणतात. ज्ञाता (जाणणारा), ज्ञेय (जाणून घेण्याची वस्तू) आणि ज्ञान ही ती त्रिपुटी. ती जोपर्यंत टिकून असते, तोपर्यंत माणसाला द्वैताचा अनुभव येतो; परंतु आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर हे तिन्ही एकरूप होतात. संत तुकोबांच्या अंतःकरणात जो ‘दीप’ उजळला आहे, तो केवळ भौतिक प्रकाश नसून तो ‘शुद्ध चैतन्य’ आहे. पाश्चात्त्य लोक यालाच ‘कॉस्मिक कॉन्शसनेस’ म्हणतात, जिथे व्यक्तीला विश्वाशी असलेले स्वतःचे अभिन्न नाते समजते. या प्रकाशात सर्व शंकांचे निरसन होते आणि केवळ अद्वैताचा आनंद उरतो !
४. निःस्वार्थ परोपकाराचे परमोच्च रूप म्हणजे संत तुकाराम महाराज !
अभंगाच्या अखेरचे संत तुकोबांचे ‘उरलों उपकारापुरता’ हे विधान त्यांच्या ‘जीवन्मुक्त’ स्थितीवर जणू शिक्कामोर्तबच करते. अद्वैत वेदांतानुसार ज्याला आत्मज्ञान झाले आहे, तो देह असेपर्यंत जगाच्या कल्याणासाठी कार्यरत रहातो. ‘अल्ट्रईझम’ किंवा निःस्वार्थ परोपकार म्हटले जाते, त्याचे परमोच्च रूप, म्हणजे संत तुकाराम महाराज ! स्वतः पूर्णत्व मिळवल्यानंतरही इतरांना त्या आनंदाची वाट दाखवण्यासाठी ते या जगात वावरतात. सगळेच संत करुणानिधान आहेत. लोकांविषयीचा हाच आत्यंतिक कळवळा इतकी अफाट रचना झाल्यावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनीही व्यक्त केलाच आहे की !
‘जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।’
(ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५) म्हणजे ‘प्राणिमात्रात जो जे इच्छील ते त्याला प्राप्त व्हावे.’
संत तुकोबारायांचीही नेमकी हीच उदात्तता दिसते आहे. संत तुकोबारायांचची ‘गाथा’ वाचण्याची नाही; अनुभवण्याची, जगण्याची आणि किमानपक्षी त्याविषयी प्रयत्नशील रहाण्याची गोष्ट आहे !
रामकृष्ण हरि ।
ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥ तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥ – जगद्गुरु संत तुकाराम महाराज
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला !