राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !

‘रामकृष्ण शिप रिपेअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाचे मालक श्री. एम्.व्ही. पै (श्री. मुंडाची वेदव्यास पै) हे प्रामाणिक, कष्टाळू, संशोधक वृत्तीचे आणि राष्ट्राभिमानी आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने माझी त्यांच्याशी जवळीक झाली आणि आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. वर्ष १९८९ मध्ये मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्हापासून श्री. पै यांनी मला धर्मप्रसाराच्या सेवेत सर्वतोपरी साहाय्य केले. त्या वेळी ते व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त असूनही मी सांगितल्यानुसार ते साधनेचे प्रयत्न करत होते. त्यांची माझ्या लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. मुंडाची वेदव्यास पै

१. साधी रहाणी

श्री. मुंडाची वेदव्यास पै हे उद्योगपती असूनही आस्थापनात जात असतांनाही त्यांची वेशभूषा अत्यंत साधी असायची. ते घरून जेवणाचा डबा घेऊन जात असत. ते प्रतिदिन गोरेगाव ते ‘फोर्ट’ (मुंबई) हा प्रवास ‘लोकल ट्रेन’ने करत असत. त्यांचा मंगळुरू येथे जहाज दुरुस्तीचा कारखाना आहे. ते ‘मुंबई ते मंगळुरू’ हा प्रवास विमानाने न करता रेल्वेच्या तिसर्‍या वर्गाच्या बोगीतून करत असत.

२. काटकसरी

ते त्यांच्या कार्यालयात पाठकोर्‍या कागदांचा वापर करत असत. ते ‘शिपिंग कॉर्पाेरेशन’च्या जहाजांसाठी ‘रबरी पार्ट्स’ (वस्तू) पुरवत असत. तेव्हा एखाद्या जहाजाच्या चालकाकडून (कॅप्टनकडून) अयोग्य मागणी आल्यास ते जहाज चालकाला सांगत, ‘‘मी मागील वेळी तुम्हाला दिलेला माल तुम्ही पडताळून पहा. हा माल मी तुम्हाला दिलेला आहे.’’ ते जहाज चालकांना अनावश्यक माल न देता काटकसर करायला सांगत असत.

पू. शिवाजी वटकर

३. प्रेमभाव

ते त्यांचे कार्यालय आणि कारखाना यातील कर्मचार्‍यांशी अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांनी सर्व कर्मचार्‍यांना आधार देऊन त्यांच्याशी कौटुंबिक नाते निर्माण केले होते. कर्मचार्‍यांच्या घरी लग्नकार्य किंवा काही घरगुती कार्यक्रम असल्यास ते कर्मचार्‍यांना आर्थिक साहाय्य करत आणि त्याच्या कार्यक्रमात सहभागी होत असत. परिणामी सर्व कर्मचारीही निष्ठेने आणि आपलेपणाने काम करत असत. आता वयाच्या ९१ व्या वर्षीही ते आठवड्यातून एकदा कारखान्यात जातात. एकदा मी त्यांना सांगितले, ‘‘आता वयोमानानुसार तुम्ही विश्रांती घ्यायला हवी. तुम्हाला आर्थिक लाभाचीही काही आवश्यकता नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे पूर्वीपासून ४ – ५ कामगार आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी व्यवसाय चालू ठेवावा लागतो.’’

४. प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ

त्यांना सध्याच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या यंत्रणांना पदोपदी तोंड द्यावे लागत होते. त्यांची कामे रखडली जायची. काही लोकांनी त्यांना व्यवसायात फसवले, तरीही त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांनी अत्यंत स्थिर राहून, चिकाटीने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय केला.

शिपिंग कार्पाेरेशनचे निर्देशक (डायरेक्टर) श्री. पै यांचा पुष्कळ आदर करत असत. देवाच्या कृपेने त्यांचा व्यवसाय अन्य स्पर्धकांच्या तुलनेत पुष्कळ चांगला चालला आणि भरभराटीला आला.

५. समाजसेवा

ते प्रतिदिन पहाटे उठून त्यांच्या ते रहातात त्या सोसायटीमधील पाण्याचा पंप चालू करणे, परिसराची स्वच्छता करणे आणि सुरक्षा रक्षकाकडे लक्ष देणे, ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, त्यांना स्वतःच्या किंवा ओळखीच्या आस्थापनात नोकरी मिळवून देणे’ यांसाठी प्रयत्न करत असत. श्री. पै यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आमच्या आस्थापनातील कर्मचारी, त्यांच्या आस्थापनातील कर्मचारी आणि समाजातील दुःखी-कष्टी लोक श्री. पै यांना मोकळेपणाने स्वतःच्या अडचणी सांगत असत. श्री. पै त्यांना सर्वतोपरी साहाय्य करून आधार देत असत. त्यांनी मंगळुरूजवळ निराश्रित आणि शिक्षण घेणार्‍या महिला यांच्यासाठी एक वसतीगृह बांधले आहे.

६. सामाजिक दायित्वाचे भान

६ अ. पैशांचा मोह नसल्यामुळे कारखान्यात बनवलेल्या रबरी वस्तू आणि इंजिनचे ‘पार्ट्स’ वाजवी दरात उपलब्ध करून देणे : पूर्वी जहाजावर यंत्रासाठी लागणार्‍या काही रबरी वस्तू (‘ओ रिंग’ आणि ‘ऑईल सील’) आणि ‘इंजिनचे पार्ट्स’ (सुटे भाग) विदेशातून मागवावे लागत असत. त्यासाठी पुष्कळ पैसा व्यय होत असे आणि वेळ लागत असे. श्री. पै यांनी संशोधन करून त्यांच्या कारखान्यात रबरी वस्तू आणि इंजिनचे ‘पार्ट्स’ बनवले. ते त्याचे मूल्य वाजवी ठेवत असत. प्रत्यक्षात त्या वस्तूंची किंमत शेकडो पटींनी अधिक होती. श्री. पै यांना पैशाचा मोह नसल्यामुळे त्यांनी यातून लाभ घेतला नाही. ‘आपण स्वदेशी वस्तू बनवून निमसरकारी आस्थापनाला, म्हणजे शिपिंग कॉर्पाेरेशनला साहाय्य केले’, याचे त्यांना समाधान होते.

६ आ. जहाजांवरील इंजिनात बिघाड झाल्यास ते स्वतः त्यांच्या कर्मचार्‍यांच्या समवेत दिवस-रात्र काम करत असत; पण त्यांनी कधीच संधीचा अपलाभ घेतला नाही. 

६ इ. अभियंत्यांना निरपेक्ष राहून शिकवणे : श्री. पै यांनी त्यांच्या कारखान्यात अनेक अभियंत्यांना जहाज दुरुस्ती (शिप रिपेअरींग) संदर्भात शिक्षण दिले आहे. काही अभियंत्यांनी श्री. पै यांच्या आस्थापनात भागीदारी केली. काही जणांनी तर प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःची आस्थापने काढली. तेव्हा श्री. पै यांना त्याविषयी वाईट न वाटता किंवा त्यांच्या मनात नकारात्मक विचार न येता ‘आपण अभियंत्यांना शिकवू शकलो. त्यांना साहाय्य करू शकलो’, याचा आनंदच होत असे.

७. अनासक्त

श्री. पै यांना खाणे-पिणे, कपडे, पैसा इत्यादी कशाचीही आसक्ती नाही. अनेक जणांनी त्यांना व्यवसायात फसवले; मात्र श्री. पै यांनी ते ‘प्रारब्ध’ म्हणून सोडून दिले. त्यांच्या मनामध्ये कुणाविषयीही सूडबुद्धी, स्पर्धा किंवा द्वेष नाही. ते म्हणतात, ‘‘मला देवाने पुष्कळ दिले आहे आणि मी समाधानी आहे.’’

८. कर्मयोगी

‘श्री. पै कर्मयोगी आहेत’, असे मला वाटते. ते निरपेक्षतेने आणि अंतर्मुख होऊन कार्य करत असत. ते ‘हाती घेतलेले कार्य चांगल्या रितीने कसे पूर्ण होईल ?’, याचा विचार करत असत. ते कार्यात आलेले यश-अपयश यांचा विचार न करता लगेच पुढच्या कार्याचा विचार करत असत.

९. राष्ट्राभिमानी 

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. त्यांचे वय झालेले असतांनाही ते प्रतिदिन सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात असत. त्यांना सध्याची राष्ट्राची स्थिती पाहून पुष्कळ दुःख होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यक्रमांना उपस्थित रहात होते. ते राष्ट्रप्रेमी हिंदूंना सर्वतोपरी साहाय्य करत असत.

१०. धर्माभिमानी 

त्यांनी त्यांच्या आस्थापनाचे नाव ‘रामकृष्ण शिप रिपेअरींग प्रायव्हेट लि.’, असे ठेवले होते. ते रामकृष्ण मिशन आणि अन्य धार्मिक न्यास यांना देणगी देत असत. ते त्यांच्या आस्थापनाच्या वतीने रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची छायाचित्रे अन् त्यांची शिकवण असलेली रोजनिशी (डायरी) छापून वितरित करत असत. ते रामकष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श ठेवून आचरण करत असत. मुंबईतील गोरेगाव येथे मसुरकर महाराज यांचा आश्रम आहे. तेथे मंदिर असून धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. तेथे हिंदूंच्या घरवापसीचे (धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात घेण्यासाठीचे) विधी केले जातात. श्री. पै मसुराश्रमाला सर्वाेतोपरी साहाय्य करत असत.

११. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यातील सहभाग

ते सनातन संस्थेचे ग्रंथ विकत घेऊन त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना भेट देतात. ते प्रतिवर्षी ११ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वार्षिक वर्गणीचे पैसे भरून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना भेट देत असत. त्यांचा मंगळुरू येथे कारखाना आहे. ते ‘मंगळुरू येथील सनातनच्या आश्रमासाठी मी काही साहाय्य करू शकतो का ?’, असे विचारत होते. तेथे गेल्यावर ते ध्यानमंदिरात बसून नामजप करायचे. श्री. पै यांनी मला त्यांच्या कार्यालयातील खोली हिंदु जनजागृती समितीच्या संदर्भातील सेवा करण्यासाठी दिली होती. श्री. पै यांनी त्या खोलीत सर्व सोयी-सुविधा आणि संगणक उपलब्ध करून दिला होता. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यालयातील दूरभाष आणि फॅक्स यंत्र वापरण्याची अनुमती दिली होती.

सनातन संस्थेवर बंदीचे सावट आले होते. तेव्हा श्री. पै यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांचा विरोध असूनही श्री. पै यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही देश आणि धर्म यांच्यासाठी फार चांगले कार्य करत आहात. असे कार्य कुणीच करत नाही. तुम्ही माझ्या कार्यालयातून तुमची सेवा करा. तुम्हाला काहीही साहाय्य लागले, तर मी देईन.’’ त्यांनी वर्ष २०२४ पासून हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांसाठी त्यांच्या कार्यालयातील खोली वापरण्यास दिली आहे.

१२. अल्प अहं

वर्ष २०१४ मध्ये श्री. पै यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर त्यांचा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सन्मान सोहळा झाला होता. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी काहीच केले नाही. ही सर्व गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा आहे.’’ त्यांनी अध्यात्म आणि साधना यांविषयी जिज्ञासेने जाणून घेतले. वर्ष २०२६ मध्ये त्यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

१३. गुरु, संत आणि साधक यांच्याप्रती भाव 

मी त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि हिंदु जनजागृती समिती राबवत असलेल्या राष्ट्ररक्षण अन् धर्मरक्षण यांच्या यशस्वी मोहिमा, मला आलेल्या अनुभूती अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य, यांविषयी माहिती सांगतो. तेव्हा ते जिज्ञासेने सर्व ऐकून घेतात. तेव्हा त्यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात. श्री. पै यांचा सनातन संस्था, संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संत आणि सनातनचे साधक यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला श्री. पै यांचा सहवास आणि सत्संग लाभला. त्यांच्यामुळे मला साधना आणि सेवा करण्यास साहाय्य झाले. ‘श्री. पै यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.६.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक