‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !

‘एक दिवस मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, हे गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) वाक्य वाचले. माझ्या जीवनात मला याची प्रचीती आली. त्या संदर्भात मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. बालमैत्रीण आध्यात्मिक मैत्रीण म्हणून लाभणे आणि तिच्याशी मनमोकळेपणाने बोलता येणे

‘माझ्या एका नातेवाइकाला पुष्कळ मानसिक त्रास आहे. त्यामुळे ते नातेवाईक माझ्याशी फारसे बोलत नसत. देवाच्या कृपेने माझी बालमैत्रीण सौ. भक्ती वाडकर ही मला ‘आध्यात्मिक मैत्रीण’ म्हणून लाभली. ती आमच्या घराच्या जवळच रहात होती. मी इयत्ता पहिलीत शिकत असल्यापासून किंबहुना त्याही आधीपासून ते आतापर्यंत मी माझ्या मनातील प्रत्येक विचार मनमोकळेपणाने भक्तीला सांगू शकते, तसेच माझ्याकडून झालेल्या चुकाही तिला सांगू शकते. ही भगवंताची माझ्यावर केवढी कृपा आहे !

२. सेवा चांगली केल्यावर कौतुक करणार्‍या सौ. सविता तिळवे !

भक्तीची आई सौ. सविता तिळवे या मला त्यांची मोठी मुलगी मानतात. त्यांनी मला जीवनातील अनेक प्रसंगांत धीर दिला आहे. त्यांना मी करत असलेली सेवा आवडली की, त्या आवर्जून माझे कौतुक करतात.

सौ. गौरी प्रभास नायक

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी साधिकेला स्वतःचा सोन्याचा अलंकार विश्वासाने देणार्‍या सौ. सुप्रिया नाडकर्णी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त २२.५.२०२२ या दिवशी त्यांचा रथोत्सव झाला. त्या वेळी गुरुकृपेने मला रथोत्सवातील दिंडीत सहभागी होण्याची संधी मिळाली. मला ‘ही सेवा करायची आहे’, असे समजल्यानंतर बर्‍याच अडचणी येत होत्या. मला वारंवार चक्कर येत होती. त्यामुळे मला पेठेत जाऊन काही आणणे किंवा अधिकोषात जाऊन ‘लॉकर’मधून (टीप) अलंकार आणणे शक्य झाले नाही. (लॉकर म्हणजे बँकेद्वारे ग्राहकांना त्यांचे अलंकार, महत्त्वाची कागदपत्रे आणि मूल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी देण्यात येणारी सुविधा.) गुरुकृपेने मला नऊवारी साडी मिळाली; पण माझ्याजवळ अलंकार नव्हते. त्या वेळी सौ. सुप्रिया नाडकर्णी या साधिकेने स्वतःचा सोन्याचा अलंकार मला घालायला दिला. तेव्हा मला पुष्कळ भरून आले. माझी सेवा झाल्यावर मी त्यांना तो अलंकार द्यायला गेले असता त्या म्हणाल्या, ‘‘तुझ्याकडे तो २ दिवस राहू दे.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘साधकांना केवढा हा विश्वास ! ताईंनी माझ्या आईप्रमाणे मला विश्वासाने अमूल्य असा अलंकार दिला.’

४. वडिलांच्या मायेने प्रोत्साहन देऊन कौतुक करणारे श्री. नारायण नाडकर्णीकाका !

श्री. नारायण नाडकर्णी यांना माझे नेहमी कौतुक वाटते. कुठेही एखादा विषय मांडायची सेवा, उदा. सूत्रसंचालन करणे, प्रवचन करणे, मुलाखत घेणे इत्यादी असेल, तर काका माझ्या नावाची शिफारस करतात. ‘आमची गौरी हे करील’, असे ते सांगतात. कार्यक्रम झाल्यावर काका मला आवर्जून भ्रमणभाष करून मी केलेल्या सेवेविषयी कौतुकही करतात. माझे (M.Tech. in Applied Artificial Intelligence) या संदर्भातील पुढील शिक्षण चालू आहे. त्याबद्दल काकांना माझे पुष्कळ कौतुक आहे.

५. आई-वडील रुग्णाईत असतांना मोठ्या भावाप्रमाणे आधार देणारे साधक !

वर्ष २०२३ मध्ये झालेल्या एका अधिवेशनाच्या वेळी माझ्याकडे एक सेवा होती. त्या वेळी घरी माझे आई-बाबा रुग्णाईत होते. तेव्हा घरचे सगळे आवरून मी सेवेला यायचे. तेव्हा श्री. निनाद ओक आणि श्री. रोहन पातेने माझी विचारपूस करत होते. त्यांनी मला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला जर भाऊ असता, तर त्यानेही मला असेच सांगितले असते.’ त्या वेळी माझी देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव असतांना श्री. प्रसन्न निमकर यांनीही मला आधार दिला. माझे मन अस्वस्थ असतांना त्यांच्याशी बोलल्यावर मला चांगले वाटले.

६. लहान भावंडांप्रमाणे जवळीक साधणारे साधक ! 

मी ‘टेक्निकल’ किंवा ‘सोशल मीडिया’ यांच्याशी संबंधित सेवा करते. तेव्हा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेले कु. संस्कृती गुरव, कु. कल्पिता गडेकर, श्री. अनमोल करमरकर, श्री. जयेश पाटील अन् श्री. प्रफुल्ल शेलार यांच्याशी बोलतांना ‘मी त्यांची मोठी बहीण आहे’, असे मला जाणवते. त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळते आणि मलासुद्धा लहान झाल्यासारखे वाटते.

७. नागपूर येथील सौ. गौरी जोशी यांनी मोठ्या बहिणीप्रमाणे आतिथ्य करून काळजी घेणे 

एकदा नागपूर येथील साधिका सौ. गौरी जोशी सेवेनिमित्त गोवा येथे आल्या होत्या. तेव्हा माझी त्यांच्याशी एकदाच भेट झाली होती. नंतर मी शिक्षणासाठी नागपूर येथे गेल्यावर सौ. गौरी जोशी यांनी मला घरी बोलावले. त्या वेळी ताईंनी माझी मोठी बहीण असल्यासारखा माझा चांगला पाहुणचार केला. मी गोवा येथे आल्यावर ‘माझ्या अडचणी सुटल्या आहेत कि नाहीत’, याविषयीही त्यांनी विचारले.  त्यांना शारीरिक त्रास आहेत, तरीही त्यांनी माझ्या काळजीपोटी मला संपर्क करणे आणि मला आवश्यक असे उपयुक्त संपर्क क्रमांक पाठवणे, हे सर्व सहजतेने केले. मला त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

८. प्रत्येक कठीण प्रसंगी आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन आधार देणारे आढावा सेवक ! 

उत्तरदायी साधकांनी आपल्याला व्यष्टी आणि समष्टी साधना यांची आढावा देण्याची पद्धत घालून दिली आहे. मला लाभलेल्या प्रत्येक आढावा सेवकाने मला प्रत्येक कठीण प्रसंगी आध्यात्मिक दृष्टीकोन दिला. सौ. सुप्रिया पाटील, सौ. लता ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६७ वर्षे), श्रीमती रेखा माणगावकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६५ वर्षे) सौ. ज्योत्स्ना जगताप या सर्वांनीच मला आधार दिला आहे. त्यांना अडचणी असतांनाही त्यांनी माझ्या अडचणी सोडवून मला शांत करणे आणि तत्त्वनिष्ठ राहून मला मार्गदर्शन करणे, या कृतींतून मला पुष्कळ आधार दिला.

९. श्री. दामोदर वझे आणि सौ. वझे यांनी आई-वडिलांप्रमाणे माया करणे 

श्री. दामोदर वझे आणि सौ. वझेकाकू हे माझ्यावर आई-वडिलांप्रमाणे माया करतात. काकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणतेही आध्यात्मिक स्तरावरील उपाय (विधी) पूर्ण समरस होऊन करतात. त्याचा यजमानांना निश्चितच लाभ होतो. माझ्या आईच्या आजारपणात तिचे शस्त्रकर्म करण्यापूर्वी काही विधी करायचे होते. तेव्हा आम्ही काकांना भ्रमणभाष केल्यावर त्यांनी ‘कोणते विधी करावे लागतील ?’, याविषयी सांगितले. त्यांनी सर्व विधी भावपूर्ण केले. इतकेच नव्हे, तर आमची अडचण लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या घरूनच आमची आणि विधीसाठी आलेल्या ब्राह्मणांची चहा-नाश्त्याची सोय केली. या कठीण प्रसंगी काकांनी दाखवलेल्या उदारतेमुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. सौ. वझेकाकू सेवेनिमित्त आमच्या घरी आल्यावर आमच्या कुटुंबातील सर्वांची विचारपूस करतात आणि त्यांना साधना सांगतात. त्यांचे बोलणे ऐकून सर्वांना चांगले वाटते.

१०. गुरुदेवांची अनुभवत असलेली कृपा !

गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) मला साधकांमध्ये ‘आई, वडील, भाऊ, बहीण’ इत्यादी नाती अनुभवायला दिली. खरंच ‘साधक हे गुरुदेवांचे समष्टी रूप आहेत’, हे मी अनुभवत आहे. मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधक माझ्याकडे पाहून स्मितहास्य करतात आणि ‘ताई कशी आहेस ?’, असे प्रेमाने विचारतात. तेव्हा मला होत असलेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ‘गुरुदेव माझ्या समवेत सतत सूक्ष्मातून असून अनेक कठीण प्रसंगांत ते माझ्या समवेत सावलीप्रमाणे असतात’, असे मला जाणवते.

‘त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव’ ।। १४ ।।
– श्रीगुरुस्तोत्रम् ।

अर्थ : हे गुरुदेवा, तूच माझी माता, पिता, बंधू, सखा, विद्या, धन, देव आणि सर्वस्व आहेस.

मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

-सौ. गौरी प्रभास नायक, ढवळी, फोंडा, गोवा. (२४.४.२०२६)                   ॐ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक