Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ :  ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !

  • ४० सहस्र देणगीदारांकडून सव्वादहा कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप !

  • पाकमधील ‘दावत-ए-इस्लामी’ या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत आहे ‘अल् हलिमी फाऊंडेशन’ !

सोलापूर – बार्शी येथील ‘अल् हलिमी फाऊंडेशन’ प्रकरणात सोलापूरच्या आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) न्यायालयात तब्बल १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र सादर केले आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी न करता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ४ वर्षांत अनुमाने सव्वादहा कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप संस्थेवर करण्यात आला आहे. या कालावधीत प्रतिवर्षी सरासरी १० सहस्र देणगीदारांकडून, तर एकूण ४० ते ४५ सहस्र देणगीदारांकडून निधी स्वीकारण्यात आल्याची माहिती अन्वेषणात समोर आली आहे.

पाकिस्तानातील ‘दावत-ए-इस्लामी’ या संस्थेच्या अंतर्गत बार्शीतील ‘अल् हलिमी फाऊंडेशन’ कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष अन्सार रफिक पठाण (बार्शी), उपाध्यक्ष आरिफ रशीद बागवान (मोहोळ) आणि सचिव असलम लतिफ शेख (बार्शी) हे संस्थेचा कारभार पहात होते. यांपैकी उपाध्यक्ष आरिफ बागवान आणि संस्थेचे लेखापाल यांना अटक करण्यात आली असून अध्यक्ष अन् सचिव पसार आहेत. फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र सोलापूर, बीड, धाराशिव आणि पुणे या जिल्ह्यांपर्यंत मर्यादित होते. या भागांत संस्थेद्वारे ६ ते ७ मदरसे चालवले जात होते. जमा झालेल्या निधीतून शेकडो विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण दिले जात असल्याचे अन्वेषणात नमूद करण्यात आले आहे.
अन्वेषणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानातील ‘दावत-ए-इस्लामी’ संस्थेशी संबंधित भारतातील विविध राज्यांमध्ये, तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत काही स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्याचे ‘ए.टी.एस.’ने म्हटले आहे. त्यांपैकी काही संस्थांनी बनावट नोंदणी क्रमांकाचा वापर करून बँक खाती उघडल्याचा, तसेच आयकर विभाग आणि ‘पॅनकार्ड’ यांसाठीही त्याच नोंदणी क्रमांकाचा वापर केल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. सामाजिक संस्थेच्या नावाखाली जमा झालेल्या निधीपैकी ७० ते ८० टक्के रक्कम पगारावर खर्च झाल्याचे दाखवण्यात आल्याचाही उल्लेख आहे.

कोण नियमित देणगीदार होते ? जमा झालेल्या निधीचा नेमका कशासाठी वापर करण्यात आला ? या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का ? तसेच पाकिस्तानातील संबंधित व्यक्तींशी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा संपर्क कशासाठी होता ? या सर्व गोष्टींचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून चालू आहे.

‘दावत-ए-इस्लामी’ची पार्श्वभूमी

‘दावत-ए-इस्लामी’ ही संस्था वर्ष १९८१ मध्ये पाकिस्तानातील कराची येथे मौलाना इलियास कादरी यांनी स्थापन केली. ही आंतरराष्ट्रीय सुन्नी इस्लामिक संस्था १७२ हून अधिक देशांत कार्यरत असून तिचे मुख्यालय कराची येथे आहे. ‘मदनी चॅनेल’ ही दूरदर्शन वाहिनी, मदरसे आणि विविध शैक्षणिक संस्था या संस्थेद्वारे चालवल्या जातात. बार्शीतील ‘अल् हलिमी फाऊंडेशन’च्या पदाधिकार्‍यांचा या संस्थेशी संबंध असल्याचे अन्वेषणात समोर आल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.