ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद

फिरोज शेख अटकेत

ठाणे, १२ जुलै (वार्ता.) – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि कुटुंबीय, तसेच काझी बाबा अन् फिरोज शेख यांच्याविरुद्ध येथील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीत शारीरिक आणि मानसिक छळ, फसवणूक अन् अघोरी कृत्यांचे गंभीर आरोप केले असून फिरोज शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

१. तक्रारीत म्हटल्यानुसार विवाहानंतर सासरच्यांनी गिरीजा यांचा सातत्याने छळ केला. तिच्या इच्छेविरुद्ध केस कापण्यात आले, बळजोरीने गोमूत्र पाजण्यात आले, तसेच तिच्यावर अघोरी विधी आणि जादूटोण्याचे प्रयोग करण्यात आले. काझी बाबा आणि फिरोज शेख यांच्या माध्यमातून जादूटोणा केल्याचाही आरोप तक्रारीत आहे.

२. विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते निराधार असल्याचे म्हटले आहे. या घटना वर्ष २०१८ ते २०२२ या कालावधीत घडल्या असतील, तर तक्रार वर्ष २०२६ मध्ये का प्रविष्ट केली ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

३. समेटाच्या चर्चेच्या वेळी मोठ्या आर्थिक मागण्या करण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करीत आहेत.