संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सिद्ध !

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा, १२ जुलै (वार्ता.) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून १५ ते १९ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकर्‍यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी आणि सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाडेगाव येथील दत्त घाट अन् लोणंद येथील पालखीतळाला भेट देऊन पूर्वसिद्धतेचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘वारीमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स वाढवावेत. ज्या ठिकाणांहून टँकरमध्ये पाणी भरले जाणार आहे, त्या स्रोतांची पडताळणी करावी. वारकर्‍यांना तात्काळ वैद्यकीय साहाय्य मिळावे, यासाठी आरोग्य विभागाने अधिकाधिक फिरती पथके सिद्ध ठेवावीत. वारकर्‍यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, यासाठी पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. आवश्यकता भासल्यास जवळच्या जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बळ मागवून घ्यावे. प्रशासनाच्या वतीने वारकर्‍यांसाठी पुरवण्यात येणार्‍या सुविधांची माहिती देणारे फलक जागोजागी लावण्यात यावेत. सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.’’

या वर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या टँकरची, तसेच शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातील, तसेच सोहळ्यात सुसज्ज रुग्णवाहिकाही सिद्ध रहाणार आहेत. पालखी सोहळा भक्तीमय आणि सुरक्षित वातावरणात मार्गस्थ करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन सिद्ध झाले आहे. यासाठी विविध विभागांच्या बैठका घेऊन संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.