श्रीराममंदिर हे भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय असून तेथे खर्‍या अर्थाने मंदिर बनेल, तेव्हा मी दर्शनासाठी जाईन !

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

रायबरेली (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिर हे अजून श्रीराममंदिर नाही, तर भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यालय आहे. जेव्हा ते खर्‍या अर्थाने श्रीराममंदिर बनेल, तेव्हाच मी तिथे दर्शनासाठी जाईन, असे वक्तव्य ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे केले.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत, हे चांगले आहे; पण हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न होत आहे. सरकारने न्यास आणि विशेष अन्वेषण पथक यांची स्थापना केली. एकाच घरातील मुले चोर-पोलीस खेळतात, त्यासारखेच हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणी निर्णय काय लागणार ?, असा प्रश्नही शंकराचार्यांनी उपस्थित केला.