मुंबईत सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने १७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी (मुंबई) येथे ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकाला यज्ञ ‘ऑनलाईन’ पहात असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीराजमातंगीदेवी

१. ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ आरंभ होण्यापूर्वी

अ. ‘यज्ञाची पूर्वसिद्धता कशी करायची ?’, याविषयी श्रीराजमातंगीदेवीच साधकांना सुचवत आहे आणि त्याप्रमाणे सर्व जण सेवा करत आहेत. ‘जणू काही हा महायज्ञ व्हावा’, ही श्रीराजमातंगीदेवीचीच इच्छा होती’, असे मला वाटत होते.

आ. ‘यज्ञाच्या ठिकाणी होत असलेले सनईवादन उच्च लोकात होत आहे’, असे मला जाणवले. मी सनईवादन ऐकण्यात रमून गेलो.

इ. सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश वाजत गाजत व्यासपिठाकडे घेऊन येत असतांना ‘तेथे सर्व देवतांचे आगमन होत आहे’, असे मला वाटले.

ई. यज्ञाला प्रारंभ होण्यापूर्वी पुरोहित श्री गणेशाला आवाहन करत असतांना ‘श्री गणपति आणि अन्य देवता यागाच्या ठिकाणी आल्या आहेत’, असे मला जाणवले.

२. ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञ’ होत असतांना

श्री. शंकर नरुटे

अ. ‘कलियुगात जन्म झालेल्या साधक जिवांचा उद्धार व्हावा’, यासाठी श्री राजमातंगीदेवी तेथे प्रकटली आहे’, असे मला वाटत होते.

आ. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जवळच हा यज्ञ होत असल्यामुळे श्री सिद्धिविनायक यज्ञातील सर्व अडथळे दूर करण्यास सिद्ध असल्याचे मला जाणवत होते.

इ. यज्ञ करणारे पुरोहित पूर्वीच्या काळात यज्ञ करणार्‍या ऋषीमुनींसारखे दिसत होते. ‘त्यांच्यामध्ये ऋषीमुनी सूक्ष्म रूपात वास करत आहेत’, असे मला वाटले.

ई. ‘महायज्ञात दिली जाणारी प्रत्येक आहुती श्री राजमातंगीदेवी स्वीकारत असून ती सर्वांना आशीर्वाद देत आहे’, असे मला सूक्ष्मातून वारंवार दिसत होते. श्री राजमातंगीदेवी महायज्ञात आहुती दिल्या जात असतांना ‘हळूहळू वातावरणात पालट होत आहे’, असे मला जाणवत होते.

उ. मुंबईत हा महायज्ञ होत असल्यामुळे ‘श्री राजमातंगीदेवी आणि मुंबईची मुंबादेवी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.

ऊ. ‘भारताचे रक्षण व्हावे आणि लोककल्याण साधावे’, यांसाठी हा यज्ञ होत असल्याने ‘देवी सर्व हिंदूंना शक्ती देत आहे’, असे मला जाणवत होते.

ए. ‘यज्ञस्थळी उपस्थित असलेले श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल  गाडगीळ यांच्या ठिकाणी देवताच आहेत’, असे मला वाटत होते. ‘हा महायज्ञ पृथ्वीवर होत नसून देवलोकात होत आहे’, असे मला जाणवत होते.

ऐ. ‘महायज्ञाला आरंभ झाल्यापासून पूर्णाहुतीपर्यंतचा काळ, म्हणजे आपण कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल करत आहोत’, असे अनुभवता येत होते.

ओ. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी देवद आश्रमातून बाहेर पाहिल्यावर आकाशात लालसर निळा प्रकाश पसरलेला दिसत होता .

औ. मी देवद आश्रमात बसून यज्ञ ‘ऑनलाईन’ पहात असूनही ‘मी प्रत्यक्ष यज्ञाच्या ठिकाणी उपस्थित आहे आणि तेथील चैतन्य अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते.

अं. ‘यज्ञाचे स्थळ, वेळ आणि काळ हे सर्व भगवंताने ठरवलेले आहे आणि त्यानुसार आपोआप घडत आहे’, असे मला जाणवले.

क. सर्व देवतांची शक्ती महायज्ञाच्या ठिकाणी एकवटल्यामुळे अधिक चैतन्य जाणवत होते.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक