जपमाळ

‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत

‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते. सध्या पेठेत अनेक प्रकारचे ‘काऊंटर्स (संख्या मोजण्याची यंत्रे)’ मिळतात. बरेच जण त्यांचाही वापर आवर्जून करतात; मात्र शास्त्रकारांनी गृहीत धरले आहे की, आपण जप करायला बसत आहोत, म्हणजे जपमाळ वापरत असणार. त्याला अनुसरून ‘आपली जपमाळ कशी असावी ?’, याविषयी शास्त्र काय सांगते ?’, हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

१. जपमाळ कशी असावी ?

अ. जपमाळ १०८, ५४ किंवा २७ मण्यांची असावी. यापेक्षा अल्प मण्यांची माळ जपासाठी वापरू नये. याचाच अर्थ बोटामध्ये अंगठीप्रमाणे घातलेली ‘बोटमाळ’ जप मोजण्यासाठी उपयुक्त नाही; मात्र नामजपाची आठवण रहाण्यासाठी या माळेचा वापर करण्यास काहीच हरकत नाही.

आ. माळ तुळशीच्या काष्ठाची, रुद्राक्षाची किंवा स्फटिकाची असावी.

इ. जपमाळेच्या २ मण्यांच्या मध्ये दोर्‍याची गाठ किंवा अन्य मणी असावा; जेणेकरून माळेतील मणी एकमेकांना आपटणार नाहीत.

२. अभिमंत्रित जपमाळ

श्री. अमर जोशी

पूजा इत्यादी अनुष्ठानांमधील जप किंवा दीक्षापूर्वक घेतलेला मंत्रजप करतांना अभिमंत्रित माळ वापरावी. दीक्षापूर्वक घेतलेला मंत्रजप, म्हणजे संध्येतील गायत्री मंत्रजप, गुरूंनी दीक्षापूर्वक दिलेला गुरुमंत्र इत्यादी.

नित्याचे अन्य जप करण्यासाठीही अभिमंत्रित, म्हणजेच संस्कारित माळ वापरल्यास जपाचा अनेक पटींनी लाभ होतो.

२ अ. जपमाळ अभिमंत्रित करण्याचा विधी

१. ‘गायीपासून उत्पन्न झालेले दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय (शेण) आणि दर्भ (एक प्रकारचे गवत) भिजवलेले पाणी’ यांचे मिश्रण करावे. या मिश्रणाने माळ धुवावी.

२. धुतलेली माळ पिंपळाच्या पानावर ठेवावी.

३. माळेला स्पर्श करून पुढील अक्षरे म्हणावीत

‘अंआंइंईंउंऊंऋंऋृंलृंॡंएंऐंओंऔंअंअः कंखंगंघंङं चंछंजंझंञं टंठंडंढंणं तंथंदंधंनं पंफंबंभंमं यंरंलंवंशंषंसंहंलंक्षं ।’

४. माळेतील प्रत्येक मण्याला स्पर्श करून प्रत्येकी १० वेळा ‘ईशानाय नमः।’, असा जप करावा. शेवटी मेरूमण्याला स्पर्श करून वरील जप १०० वेळा करावा. अशा प्रकारे माळ ‘अभिमंत्रित’ होते.

२ आ. अभिमंत्रित माळेची पूजा 

१. ‘सद्योजाताय नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।।’, असे म्हणून माळेला गंध लावावे.

२. ‘वामदेवाय नमः । पुष्पं समर्पयामि ।।’, असे म्हणून फुले वहावीत.

३. ‘अघोराय नमः । धूपं समर्पयामि ।।’, असे म्हणून धूप किंवा उदबत्ती ओवाळावी.

४. ‘तत्पुरुषाय नमः । दीपं समर्पयामि ।।’, असे म्हणून निरांजन ओवाळावे.

५. ‘ईशानाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।।’, असे म्हणून एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

– श्री. अमर जोशी

जपमाळ कशी वापरावी ? 

१. जपमाळ उजव्या हातात धरावी. अनामिका (करंगळीच्या शेजारचे बोट) आणि अंगठा यांची टोके जुळवून ती टोके जेथे एकत्र येतात, त्या ठिकाणी माळ धरावी आणि मध्यमेने (मधल्या बोटाने) माळ ओढावी.

२. जप करतांना माळेला तर्जनीचा (अंगठ्याच्या बाजूच्या बोटाचा) स्पर्श करू नये.

अभिमंत्रित माळ वापरण्याचे नियम  

१. जप करतांना माळ नेहमी वस्त्राने झाकून घ्यावी. यासाठी पेठेत माळ जपण्यासाठीची कापडी पिशवी (गोमुखी) मिळते. तिचाही वापर करू शकतो.

२. माळेचा भूमीला कधीही स्पर्श होऊ देऊ नये. तसे झाल्यास माळ धुऊन आणि हातात घेऊन १०८ वेळा ‘ईशानाय नमः ।’, हा जप करावा.

३. माळ पायाखाली आल्यास माळ धुऊन आणि हातात घेऊन ‘ईशानाय नमः ।’, हा जप २१६ वेळा करावा.

४. सोयर, सुतक, तसेच स्त्रियांची मासिक पाळी इत्यादी चालू असतांना अभिमंत्रित माळेला स्पर्श करू नये. तसे झाल्यास वरील अभिमंत्रणाचा पूर्ण विधी पुन्हा करावा.

५. अभिमंत्रित माळ दिवसभर गळ्यात धारण करण्यासाठी वापरू नये. पूजेच्या वेळी ही माळ अवश्य धारण करावी. दिवसभर माळ धारण केली, तर ‘लघुशंका इत्यादींसाठी जातांना माळ काढणे आणि आचमनादी (२ वेळा आचमन आणि एकदा प्राणायाम इत्यादी) झाल्यानंतरच माळ पुन्हा धारण करणे’, असे अनेक नियम लागू होतात. सध्याच्या काळात आपल्याला हे शक्य नसते. त्यामुळे ही माळ पूजेनंतर देवघरातच ठेवावी. गळ्यात घालण्यासाठी अभिमंत्रित नसलेली अन्य माळ वापरू शकतो.’

(साभार : ‘धर्मसिंधु’)

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (१०.५.२०२६)

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास किंवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’ – श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (८.४.२०२६)