निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक १३३
१. लसिका (Lymph)
हा शरिरातील पेशींमध्ये आढळणारा रंगहीन आणि पारदर्शक द्रव आहे. तो रोगप्रतिकारक शक्तीचा महत्त्वाचा भाग आहे. हा द्रव लसिका वाहिन्यांमधून (Lymph vessels) वहातो आणि रक्ताभिसरण संस्थेचे समांतर काम करतो. तो शरिरातील टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि प्रथिने वाहून नेतो.
रक्तातील द्रव (Plasma), जेव्हा केशवाहिन्यांमधून ऊतींमध्ये (Tissues) झिरपतो, तेव्हा त्याला ‘लसिका’ म्हणतात. यात पांढर्या रक्तपेशी (Lymphocytes), प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि पाण्याचे प्रमाण अधिक असते; मात्र यांत लाल रक्तपेशी नसतात.
२. सूज आणि लसिका प्रणालीचा संबंध
‘येथे लसिका प्रणालीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ही प्रणाली शरिराची निचरा व्यवस्था (ड्रेनेज) आणि संरक्षण यंत्रणा आहे. शरिरातील अतिरिक्त द्रव, कचरा आणि जंतू बाहेर काढण्याचे काम ती करते. घरातील कचर्याचा निचरा नीट झाला नाही किंवा घरात पाण्याचा योग्य प्रवाह नसेल, तर घाण साचते. त्याचप्रमाणे शरिरात लसिका द्रव योग्यरित्या वाहिला नाही, तर सूज निर्माण होऊ शकते. लसिका प्रणालीमध्ये रक्ताभिसरणासारखा हृदयाचा मध्यवर्ती पंप नसतो. लसिका वाहिन्यांमध्ये झडपा असल्या, तरी तिचा मुख्य प्रवाह हा स्नायूंच्या हालचालींवर आणि खोल श्वसनावर अवलंबून असतो. चालणे, व्यायाम करणे किंवा स्नायू आकुंचन पावणे यांमुळे लसिका वाहिन्यांवर सौम्य दाब निर्माण होतो आणि द्रव पुढे सरकतो. खोल श्वसनामुळे छातीतील दाब पालटतो आणि लसिका द्रव वरच्या दिशेने खेचले जाते. त्यामुळे हालचालींचा अभाव, दीर्घकाळ बसून रहाणे किंवा निष्क्रीय जीवनशैली यांमुळे लसिका प्रवाह मंदावू शकतो.
३. लसिका संस्थेचे (Lymphatic System) विकार

जेव्हा लसिका वाहिन्यांमध्ये अडथळा येतो, तेव्हा शरिराचे काही अवयव सुजतात. संसर्गामुळे लसिका ग्रंथींमध्ये सूज येऊ शकते. यात लसिका द्रव, लसिका वाहिन्या आणि लसिका ग्रंथी (उदा. काखा, मान) यांचा समावेश होतो. जर लसिका वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला, लसिका ग्रंथी काढल्या गेल्या किंवा प्रणालीचे कार्य न्यून झाले, तर द्रव योग्यरित्या परत जाऊ शकत नाही. अशा वेळी निर्माण होणारा दीर्घकालीन जडपणा आणि कडकपणा जाणवणारी सूज म्हणजे लसिका सूज (लिम्फेडेमा) होय. या स्थितीत हात किंवा पाय कायमस्वरूपी जाड आणि जड होऊ शकतात. त्वचा जाड आणि कडक होऊ शकते, तसेच वारंवार संसर्ग होण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे सूज ही केवळ दिसण्यापुरती समस्या नसून ती शरिराच्या कार्यक्षमतेशी संबंधित गंभीर अवस्था असू शकते.
४. लसिका प्रणालीचे कार्य
४ अ. रोग प्रतिकारशक्तीत (Immunity) लसिका प्रणालीची भूमिका : शरिरातील संसर्ग, जंतू आणि मृत पेशी नष्ट करण्याचे कार्य लसिका ग्रंथी (Lymph Nodes) करतात. जसे देशाच्या सीमेवर सैनिक सतत तैनात राहून देशाचे संरक्षण करतात, तसेच लसिका प्रणाली आपल्या शरिराचे रोगांपासून रक्षण करते. बाहेरून जंतू, विषाणू किंवा इतर घातक घटक शरिरात प्रवेश करताच लसिका प्रणाली त्यांची ओळख करून त्यांच्याविरुद्ध लढा देण्याची प्रक्रिया चालू करते. शरिरातील लसिका द्रव विविध उतींमधून फिरत असतांना त्या भागातील जंतू, मृत पेशी आणि टाकाऊ पदार्थ गोळा करून लसिका ग्रंथीकडे नेतो.
४ आ. लसिका प्रणाली ही शरिराची महत्त्वाची संरक्षणव्यवस्था ! : लसिका ग्रंथी (Lymph nodes) हानीकारक पदार्थ, टाकाऊ घटक आणि सूक्ष्म जंतू गाळून शरिराला संसर्गापासून वाचवतात. या लसिका ग्रंथी, म्हणजे शरिरातील लहान ‘फिल्टर’ केंद्रांसारखे काम करतात. लसिका ग्रंथींमध्ये विशेष प्रकारच्या रोगप्रतिकारक पेशी असतात. जंतू शरिरात प्रवेश करताच या पेशी त्यांना ओळखतात आणि नष्ट करण्याची प्रक्रिया चालू करतात. काही पेशी जंतूंविरुद्ध विशेष संरक्षणद्रवे (अँटीबॉडी) निर्माण करतात, तर काही थेट संक्रमित पेशींवर आक्रमण करतात. त्यामुळेच संसर्ग झाल्यावर मान, काखा (Armpit) किंवा जांघा यांच्या मुळाशी सुजल्यासारख्या गाठी दिसतात. प्रत्यक्षात त्या गाठी म्हणजे सूज नसून जंतूंशी लढतांना सक्रीय झालेल्या लसिका ग्रंथी असतात. म्हणजेच शरिराची संरक्षण प्रक्रिया चालू असल्याचा तो संकेत असतो.
लसिका प्रणाली केवळ जंतूंना अडवत नाही, तर संसर्गाचा प्रसार रोखून शरिराची रोग प्रतिकारशक्ती योग्य वेळी सक्रीय करते. थोडक्यात सांगायचे, तर लसिका प्रणाली ही शरिराची महत्त्वाची संरक्षणव्यवस्था आहे. ती जंतूंना ओळखते, त्यांच्याशी लढते आणि शरिराला आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास साहाय्य करते.
४ इ. शरिरातील कचरा बाहेर टाकणे (Waste Removal) : पेशींच्या चयापचय प्रक्रियेतून निर्माण झालेला टाकाऊ कचरा आणि मृत पेशी शरिरातून काढून टाकत असते. आपण दिवसभर मेंदूचा वापर करत असतो. या प्रक्रियेत मेंदूमध्ये सूक्ष्म टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. शरिरातील इतर अवयवांप्रमाणे मेंदूचीही स्वच्छता होणे आवश्यक असते.
४ इ १. लसिका प्रणालीचे कार्य निर्विघ्नपणे चालण्यासाठी झोपेची आवश्यकता ! : संशोधनानुसार मेंदूमध्ये लसिका प्रणालीसारखीच एक विशेष व्यवस्था असते, त्याला ‘ग्लिम्फॅटिक’ प्रणाली म्हणतात. ही व्यवस्था मेंदूत साचलेले टाकाऊ घटक बाहेर काढण्याचे काम करते. ही प्रक्रिया मुख्यतः गाढ झोपेत सक्रीय होते. पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदूची स्वच्छता पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे डोके जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे, चिडचिड किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो; म्हणून झोप ही केवळ विश्रांती नसून मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक जैविक प्रक्रिया आहे.
४ ई. लसिका प्रणालीच्या कार्यात ताण हा अडथळा : रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडणारा अतिरिक्त द्रव (Plasma) पुन्हा रक्तप्रवाहात आणून शरिरातील पाणी आणि प्रथिनांचा समतोल राखणे होय. आपली लसिका प्रणाली ही रोग प्रतिकारशक्तीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; पण दीर्घकाळ ताण (Stress) राहिल्यास या प्रणालीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ताण आल्यावर शरीर ‘सतत सज्ज’ अवस्थेत जाते. ज्याला साध्या भाषेत ‘फाईट अँड फ्लाईट’ प्रतिक्रिया म्हणतात. या अवस्थेत शरीर ऊर्जा वाचवण्याऐवजी सतर्क रहाण्यावर भर देते. दीर्घकाळ ताण राहिल्यास शरिरातील स्नायू ताणलेले रहातात आणि सूज वाढवणारे रसायनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे लसिका द्रवाचा नैसर्गिक प्रवाह मंदावू शकतो, तसेच लसिका ग्रंथींची कार्यक्षमता न्यून होऊन संसर्गाशी लढण्याची क्षमता घटू शकते. याचा परिणाम म्हणून शरिरात जडपणा, सूज वाढणे, लवकर थकवा येणे, डोके जड वाटणे किंवा वारंवार सर्दी-खोकला होणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ‘शारीरिक हालचाल, खोल श्वसन, पुरेशी झोप आणि मानसिक ताण नियंत्रणात ठेवणे’, हे लसिका प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
४ उ. लसिका प्रणाली – चरबी आणि जीवनसत्त्वांच्या शोषणातील महत्त्वाची भूमिका ! : आपण जे अन्न खातो, त्यातील चरबी आणि काही महत्त्वाची जीवनसत्त्वे (A, D, E, K) थेट रक्तात शोषली जात नाहीत. चरबीचे कण आकाराने मोठे असल्यामुळे ते आधी लहान आतड्यातील विशेष लसिका केशवाहिन्यांत प्रवेश करतात. लसिका प्रणाली हे कण गोळा करून त्यांना छातीतील मुख्य नलिकांमार्फत पुन्हा रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे शरिराला आवश्यक पोषण मिळून ते योग्य ठिकाणी पोचते. लसिका प्रणाली नीट कार्यरत नसल्यास चरबीचे शोषण न्यून होऊ शकते आणि जीवनसत्त्वांची न्यूनता (कमतरता) निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘लसिका प्रणाली’ ही केवळ सूज नियंत्रणासाठी नाही, तर योग्य पोषणासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे.’ (क्रमशः पुढच्या रविवारी)
– कु. वैदेही राजेंद्र शिंदे, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) अभ्यासक, फोंडा, गोवा. (२४.३.२०२६)

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !