Telangana Murders : रंगारेड्डी (तेलंगाणा) येथे जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने पत्नी, मुले यांच्यासह तक्रारदारासह ६ जणांची केली हत्या

आरोपी राजू कुमार

रंगारेड्डी (तेलंगाणा) – येथे जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीने १० जुलैच्या रात्री पत्नी, मुले, तसेच तक्रार करणारी १६ वर्षीय मुलगी आणि तिचे नातेवाईक अशा ६ जणांची हत्या केली. आरोपामध्ये अटकपूर्व जामीन संमत झाल्यानंतर गेल्या महिन्यात वैयक्तिक हमीपत्रावर आरोपीला जामीन मिळाला होता. हत्या करून आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राजू कुमार असे या ३५ वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीने पाठलाग केला, अशी तक्रार मुलीने केली होती.

तक्रार करणार्‍या १६ वर्षीय मुलीच्या घरी आरोपी रात्री पावणे अकराच्या सुमारास पोचला. दार वाजवल्यानंतर पीडितेच्या आईने दार उघडले, आणि संशयिताने पीडितेच्या आईवर चाकूने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर झोपेत असलेल्या पीडितेच्या ६० वर्षीय आजीचीही हत्या केली. त्यानंतर आरोपीने १६ वर्षीय पीडितेला गाडीत खेचून गावातील तळ्याजवळ घेऊन जात चाकूने गंभीर वार केले यातच तिचा मृत्यू झाला. संशयिताने पीडितेचा मृतदेह तळ्याशेजारी सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता त्याने स्वतःच्या घरी घेऊन ३१ वर्षीय पत्नीचा गळा चिरून हत्या केली. त्याच पद्धतीने त्याने ४ वर्षीय आणि १८ महिन्यांचे बाळ अशा २ मुलांचाही निर्घृण पद्धतीने खून केला. दोन्ही मुले झोपेत असतांना त्याने त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने वडिलांना दूरभाष करून गुन्ह्याची स्वीकृती दिली.

संपादकीय भूमिका

एखादी व्यक्ती इतक्या टोकाची कृती करते, याचा अर्थ तिच्यावर योग्य संस्कार झालेले नसून तिला कर्मफल, प्रारब्ध आदी धर्मातील शास्त्रांची माहिती नाही, हे लक्षात येते ! हिंदु राष्ट्रात जनतेला धर्मशिक्षण दिले जाईल. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती मुळापासून न्यून केली जाईल !