रुग्णाईत स्थिती स्थिर राहून स्वीकारणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले फोंडा, गोवा येथील श्री. श्रीहरि मामलेदार (वय ६७ वर्षे) !

‘२५.५.२०२६ या दिवशी मी आणि श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६६ वर्षे) श्री. श्रीहरि मामलेदार यांच्या घरी गेलो होतो. नोव्हेंबर २०२५ पासून ते (G.B. Syndrome- मज्जासंस्थेचा एक विकार) या विकाराने रुग्णाईत आहेत. मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

श्री. श्रीहरि मामलेदार

१. शांत आणि स्थिर 

‘वर्ष २००४ पासून मी श्री. श्रीहरि मामलेदार यांच्या समवेत बांधकाम विभागात सेवा केली आहे. आताही काही सेवेत शंका असल्यास मी त्यांना विचारतो. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाचे बांधकाम होत असतांना आश्रमातील माती ‘डंपर’ (टीप) मध्ये भरून बाहेर टाकतांना ‘डंपर’च्या चाकाला लागलेली माती मार्गावर पसरत होती. तेव्हा आम्ही साधक पाण्याच्या नळीने (पाईपने) पाणी मारून खराट्याने मार्ग धुऊन काढण्याची सेवा करत होतो. ते पाहून समाजातील काही जण आमचे कौतुक करायचे, तर काही जण (विरोधक) भांडण करायचे. तेव्हा श्रीहरिभाई त्यांना शांत आणि स्थिर राहून त्यांना समजावून सांगायचे. त्यानंतर विरोधक निमूटपणे निघून जायचे.

(टीप : डंपर – यात माती, खडी किंवा वाळू वाहून नेतात. या ट्रकचा मागील भाग उचलला जातो. त्यामुळे यातील सामान सहज खाली उतरवता येते.)

२. तत्त्वनिष्ठ  

श्री. रामचंद्र कुंभार

श्रीहरिभाई बांधकाम विभागातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा आणि सेवेच्या संदर्भात सत्संग घेत असत. एकदा एका साधकाकडून चूक झाली होती. तेव्हा त्या साधकाला श्रीहरिभाईंनी तत्त्वनिष्ठपणे त्याची चूक लक्षात आणून दिली.

३. साधकाला योग्य दृष्टीकोन देणे

माझ्या मुलाला एका ठिकाणी नोकरीसाठी बोलावले होते. मी एका व्यक्तीच्या साहाय्याने ‘मुलाला ती नोकरी मिळावी’, यासाठी प्रयत्न करत असतांना ‘२ लक्ष रुपये लागतील’, असे त्या व्यक्तीने मला सांगितले. हा प्रसंग मी श्रीहरिभाईंना सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आपण साधकांनीच नोकरी मिळण्यासाठी पैसे दिले, तर तो भ्रष्टाचारच आहे.’’ त्यांनी मला योग्य दृष्टीकोन दिला. नंतर मी त्या ठिकाणी मुलाला नोकरी लागण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

४. परिस्थिती स्वीकारणे  

श्रीहरिभाई यांना बरे वाटल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा ते आम्हाला सांगत होते, ‘‘या रुग्णाईत स्थितीचा कालावधी कसा निघून गेला’, हे माझ्या लक्षातही आले नाही. मी केलेल्या चुकांबद्दल हे प्रायश्चित्त भोगत आहे आणि गुरुकृपेमुळे ते मला सहज शक्य होत आहे. या रुग्णाईत स्थितीत गुरुकृपेने मला परिस्थिती सहजतेने स्वीकारता येऊ लागली.’’

५. ‘बोलणे ऐकत रहावे’, असे वाटणे  

आम्ही श्रीहरिभाईंशी ४५ मिनिटे बोलत होतो. तेव्हा ते साधनेविषयीच बोलत होते. ‘ते बोलत असतांना त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असेच आम्हाला वाटत होते. ‘ते रुग्णाईत आहेत’, असे आम्हाला वाटतच नव्हते.

६. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगामुळे परिस्थिती स्वीकारून स्थिर रहाता येणे’, असे श्रीहरि मामलेदार यांच्या पत्नीने सांगणे  

‘त्यांच्या पत्नी सौ. दीपावहिनीही यजमानांची रुग्णाईत स्थिती आनंदाने स्वीकारत आहेत’, असे मला जाणवले. सौ. दीपावहिनी म्हणाल्या, ‘‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगामुळे आम्हाला पुष्कळ काही शिकायला मिळाले. त्यामुळे परिस्थिती स्वीकारून स्थिर रहाता आले. आम्हाला प.पू. डॉक्टरांची कृपाही सतत अनुभवता येत आहे.’’ ‘गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) साधकांच्या मनाची कशी सिद्धता करून घेत आहेत’, हे आम्हाला अनुभवता आले.’

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला भाव

श्रीहरिभाई आमच्याशी भावविभोर होऊन बोलत होते. ते वारंवार सांगत होते, ‘‘प.पू. गुरुदेवांमुळेच मला ही रुग्णाईत स्थिती स्वीकारता आली. गुरुदेवांची साधकांवर असलेली अपार कृपा मी अनुभवत आहे.’’ ते स्पष्टपणे बोलत होते. ‘आपण रुग्णाईत आहोत’, याची जाणीवही ते विसरून गेले होते. त्यांची गुरूंवरील दृढ श्रद्धाच आम्हाला अनुभवता आली.

‘श्री. श्रीहरिभाई आणि त्यांच्या पत्नी सौ. दीपा मामलेदार या दांपत्याकडून मला पुष्कळ शिकायला मिळाले’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. रामचंद्र कुंभार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२६)