योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !

‘एकदा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मुंबईला गेले होते. त्यांच्या समवेत त्यांचे काही भक्तगण होते. त्या दिवशी योगतज्ञ दादाजी यांनी भक्तांना ‘आज मी तुम्हाला नागदेवतेचे दर्शन घडवतो’, असे सांगून नागदेवतेचे दर्शन घडवले होते. त्यानंतर एकदा योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नागदेवतेविषयीची ही अनुभूती सांगितली. ती पुढे दिली आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना त्यांच्या साधनेत बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) येथील जंगलातील दैवी नागांचे साहाय्य मिळणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची साधना एवढी होती की, ते करत असलेल्या ईश्वरी कार्यासाठी त्यांना देवतांसह नागदेवतांचेही आशीर्वाद लाभले होते. महाराष्ट्रामध्ये सांगलीपासून काही अंतरावर असलेले बत्तीस शिराळा हे गाव नागांसाठी प्रसिद्ध आहे. या स्थानात आध्यात्मिक ऊर्जा असल्याने येथील जंगलामध्ये अनेक दैवी नाग तपस्येसाठी बसलेले असतात. काही उच्च स्तराचे नाग सूक्ष्मातूनही येथे वास करतात. योगतज्ञ दादाजी म्हणायचे, ‘‘ते करत असलेल्या साधनेत बत्तीस शिराळा येथील नागराजांचे त्यांना साहाय्य लाभते.’’

२. योगतज्ञ दादाजींनी ‘नागदेवता शीघ्र गतीने येण्यासाठी फुलपाखराच्या रूपातही येऊ शकतात’, असे भक्तांना सांगणे 

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

योगतज्ञ दादाजींनी त्यांच्या सर्व भक्तांना एका खोलीत हालचाल न करता गोलाकार बसण्यास सांगितले. त्यांनी नागदेवतेला मनोमन प्रार्थना केली आणि भक्तांना सांगितले, ‘‘आपल्या प्रार्थनेमुळे नागदेवता येथे येण्यास सिद्ध झाल्या आहेत. आता त्यांनी त्यांच्या स्थानाहून लगेचच प्रयाण चालू केले आहे. हे नाग दैवी असल्याने त्यांचा वेग सामान्य नसतो. ते वायूच्या वेगाने भ्रमण करतात, तसेच ते इच्छाधारी असल्याने हवे तेव्हा दुसरे कोणतेही रूप धारण करू शकतात. आवश्यक त्या ठिकाणी शीघ्र गतीने जाता यावे; म्हणून नागराज कधी कधी फुलपाखराचे रूप धारण करून उडत त्या त्या ठिकाणी जातात.’’

३. अकस्मात् खिडकीत एक फुलपाखरु येणे आणि ते गुप्त होऊन त्यामध्ये नागदेवता प्रगट होणे 

तेवढ्यात योगतज्ञ दादाजी आणि त्यांचे भक्त यांना खिडकीवर अकस्मात् एक फुलपाखरु आलेले दिसले. एका क्षणातच ते फुलपाखरु गुप्त झाले आणि अकस्मात् त्यामध्ये नागराज प्रगट झालेले भक्तांना दिसले. योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘नागराज प्रगट झाले आहेत. आपण त्यांना मनोमन प्रार्थना करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया.’’

४. एका भक्ताच्या मनात विकल्प आल्यामुळे नागराजाने त्याच्याकडे रागाने पाहून फुत्कार सोडणे; परंतु योगतज्ञ प.पू. दादाजींच्या मंत्रशक्तीने त्या भक्ताचे रक्षण होणे  

अकस्मात् प्रगट झालेले नागराज एका भक्ताच्या दिशेने रागाने पहात मोठ्याने फुत्कार सोडू लागले. योगतज्ञ दादाजींनी त्या भक्ताला विचारले, ‘‘तुम्ही मनामध्ये काही बोलला असलात, तर लगेच नागराजांची क्षमा मागावी. मी माझ्या मंत्रशक्तीने नागराजांचे विष काढून घेतले आहे. त्यामुळे तुम्ही वाचलात.’’ त्या भक्ताने नंतर सांगितले, ‘‘माझ्या मनात नागराजांविषयी क्षणभर ‘हे खरे आहे कि दृष्टीभूल आहे ?’, असा विचार आला. त्या क्षणी नागराजांनी माझ्याकडे पाहिले आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाली. मी लगेचच त्यांची क्षमा मागितली.’’ नागराजांचे दर्शन झाल्यावर दादाजींनी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि परत जाण्यासाठी त्यांना प्रार्थना केली. त्यानंतर नागराज लगेच गुप्त झाले.

अशा गोष्टी आपण पुराणांत ऐकल्या आणि वाचल्या असतील. आजही आपण तीव्र साधना केली, तर देवाची आपल्यावर निश्चितच कृपा होऊ शकते आणि आपल्यालाही अशा अनुभूती येऊ शकतात.

५. कृतज्ञता 

या कलियुगामध्येही योगतज्ञ दादाजींसारखे ऋषितुल्य तपस्वी होऊन गेले. त्यांना देवता आणि नागदेवता साधनेत साहाय्य करत असत. हे सामान्यांच्या समजण्याच्या बुद्धीपलीकडील शास्त्र आहे. ‘योगतज्ञ दादाजींसारख्या महान तपस्वी संतांमुळे आज आम्हा साधकांना देवता आणि नागराज यांच्यासारख्या दैवी जिवांचा कृपाशीर्वाद लाभला आहे’, याबद्दल योगतज्ञ दादाजींच्या चरणी आम्ही साधक कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

संग्राहक : एक साधक (२०.४.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक