Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !

वर्ष २००८ च्या कर्णावती येथील बाँबस्फोटांचे प्रकरण

यावेळी ५६ लोक ठार झाले आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले

कर्णावती (गुजरात) – येथे २६ जुलै २००८ या दिवशी लागोपाठ झालेल्या २२ बाँबस्फोटांच्या प्रकरणातील विशेष कनिष्ठ न्यायालयाचा ४ वर्षांपूर्वीचा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला. न्यायालयाने ४९ दोषींपैकी ३८ दोषींची फाशीची शिक्षा आणि उर्वरित ११ दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती ए.वाय. कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपिठाने वर्ष २०२२ मधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालानंतर प्रविष्ट केलेल्या अपीलांवर हा निर्णय सुनावला. फाशीची शिक्षा झालेल्यांमध्ये किमान १३ जण गुजरातचे, ८ उत्तरप्रदेशचे, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथील प्रत्येकी ५, केरळ आणि कर्नाटक येथील प्रत्येकी २ आणि भाग्यनगरमधील एक जणाचा समावेश आहे.

कर्णावती सरकारी नागरी रुग्णालय, एल्.जी. रुग्णालय, बसगाड्या, सायकली आणि चारचाकी गाड्या यांसह विविध ठिकाणी २२ बाँबस्फोट झाले होते. यांत ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण घायाळ झाले होते. एकूण २४ बाँबपैकी कलोल आणि नरोडा येथील प्रत्येकी एक बाँब फुटला नव्हता.

वर्ष २००२ मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीनंतर सूड उगवण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्यासाठी दोषींनी हा कट रचल्याचे  सरकारी पक्षाने म्हटले होते.

संपादकीय भूमिका

  • देशात बाँबस्फोटातील आतंकवाद्यांना १८ वर्षांनंतरही प्रत्यक्ष शिक्षा न होणे, हे लज्जास्पद ! उशिरा मिळणार न्याय हा अन्यायच होय !
  • आता हे आतंकवादी सर्वाेच्च न्यायालयात जातील आणि तेथे अनेक वर्षे खटला चालेल. त्यानंतर शिक्षा झाली, तर ते दयेची याचिका करतील आणि मग पुन्हा अनेक वर्षे जातील. या काळात ते जिवंत तरी रहातील का ?