हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीचे ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित’ अभियान ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे झारखंड येथे हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान !

‘लव्ह जिहाद’ विषयावर संबोधित करतांना सद्गुरु निलेश सिंगबाळ

धनबाद (झारखंड) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची, धनबाद आणि कतरास या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या वेळी हिंदुजागृती आणि संघटन यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

१. ‘लव्ह जिहाद’विषयावर व्याख्यान

‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियाना’च्या अंतर्गत रांची आणि कतरास येथे ‘लव्ह जिहाद’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘लव्ह जिहाद’चा इतिहास, वास्तव आणि उपाय यांवर मार्गदर्शन केले, तसेच ‘हिंदु मुलींचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करण्यासाठी समितीने ‘बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियान’ चालू केले आहे, असे सांगितले. या वेळी सनातनचे पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या व्याख्यानाचा १२५ हून अधिक तरुण-तरुणींनी लाभ घेतला. अनेकांनी शौर्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याविषयी नावनोंदणी केली.

‘लव्ह जिहाद’ विषयी व्याख्यानाला उपस्थित तरुण-तरुणी आणि सनातनचे पू. प्रदीप खेमका

२. वैयक्तिक संपर्क

या अभियानाच्या वेळी सद्गुरु सिंगबाळ यांनी रांची येथील प्रख्यात उद्योजक आणि विश्व हिंदु परिषदेचे झारखंड प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत, ‘पसारी अँड असोसिएट्स’चे प्रमुख तथा ‘झारखंड कमर्शियल टॅक्सेस बार असोसिएशन’चे अध्यक्ष अधिवक्ता आनंद पसारी, ‘चिन्मय मिशन, रांची’चे स्वामी परिपूर्णानंद, ‘रांची सिटीझन फोरम’च्या उपाध्यक्ष अन् प्रख्यात लेखिका डॉ. रेणुका तिवारी, धनबाद येथील ‘जे.आर्.डी.ए.’चे (झरिया पुनर्वसन आणि विकास प्राधिकरणचे) कौशल्य विकास सल्लागार श्री. जितेंद्र मलिक यांची भेट घेतली अन् या सर्वांना समिती करत असलेल्या राष्ट्र-धर्मविषयक कार्याची माहिती सांगितली.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या बैठकती मार्गदर्शन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

३. हिंदु राष्ट्र-जागृती बैठक

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने धनबाद येथील जगन्नाथ रुग्णालयामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती बैठकी’चे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी संबोधित केले. याप्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सुनील कुमार यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

४. आध्यात्मिक मार्गदर्शन

अधिवक्ता आनंद पसारी यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी ‘आध्यात्मिक साधनेचे महत्त्व’ या विषयावर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.