संगम माहुलीच्या (सातारा) पुलावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास !

  • पुलाला १११ वर्षे पूर्ण होऊनही याच पुलावरून वाहतूक

  • ४ वर्षांत नवीन पुलाच्या केवळ एकाच खांबाची उभारणी

एआय निर्मित चित्र

सातारा, ७ जुलै (वार्ता.) – येथील संगम माहुलीच्या पुलावरून प्रवास करतांना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या या पुलाला १११ वर्षे पूर्ण झाली आहेत. ११ वर्षांपूर्वी या ठिकाणी नवीन पुलाला मान्यता देण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात ४ वर्षांपूर्वी नवीन पुलाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. या ४ वर्षांच्या काळात पुलाचा केवळ एकच खांब उभारण्यात आला आहे. एखादी मोठी दुर्घटना होऊन नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का ? असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात नेहमीच जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न गंभीर होतो. दळणवळणासाठी असलेले हे पूल नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि सरकार यांनी जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

पडताळणी नको, उपाययोजना हवी ! – श्रीरंग काटेकर, सामाजिक कार्यकर्ते 

अनेक दशके ऊन, वारा, पाऊस, महापुराचे तडाखे आणि मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक यांमुळे या पुलांची अंतर्गत रचना पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. मुसळधार पावसात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे हे जुने पूल केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री पडताळणी अहवाल न बनवता प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे आवश्यक आहे. कर्‍हाड येथील कोयना नदीवरील आणि वाई येथील कृष्णा नदीवरील धोकादायक ब्रिटिशकालीन पूल हटवून प्रशासनाने तेथे आधुनिक पुलांची उभारणी केली. याच धर्तीवर मेढा-केळघर मार्गावर वेण्णा नदीवरील जुना पूल भुईसपाट करून नवीन पूल उभारण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • अशा गतीने काम केल्यावर कधीतरी वेळेत पूल बांधून होणार का ?
  • पूल बांधकामावर प्रशासनाचा अंकुश नाही का ? 
  • नवीन पुलाच्या बांधकामाला ४ वर्षे विलंब करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना कारागृहात डांबायला हवे !