पुणे शहरात ६ दिवसांत पडला महिन्याभराचा पाऊस !

पुणे – जूनमध्ये सरासरीपेक्षा अल्प पावसाची नोंद झाली होती. १ जुलैपासून चालू असलेल्या पावसाने केवळ ६ दिवसांमध्ये संपूर्ण जुलै महिन्याची सरासरी गाठली आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात जुलैमध्ये १८५ ते २१४ मिलिमीटर पाऊस पडतो. तेवढाच पाऊस गेल्या ६ दिवसांमध्ये झाला आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार ५ आणि ६ जुलै या दिवशी शिवाजीनगरमध्ये पडलेला १०८.४ मिलिमीटर पाऊस एका दिवसातील ४ थ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस आहे.

पावसामुळे पुणे विमानतळावरील उड्डाणसेवा विस्कळीत !

पुणे – सतत कोसळणार्‍या पावसामुळे पुणे विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत झाली असून २ विमानांच्या वेळेत पालट केला. काही विमानांची उड्डाणे विलंबाने झाली, तर दुपारपासून हवामानात सुधारणा होत असल्याने विमानसेवा पूर्ववत् होत असल्याचे विमान प्रशासनाने सांगितले. उड्डाणे व्यतिरिक्त विमानतळ टर्मिनलवरील सर्व व्यवहार सुरळीत होते. चेक-इन, सामान हाताळणी, सुरक्षा पडताळणी आणि प्रवासी सुविधा यात व्यत्यय आला नाही. प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय साहाय्य आणि माहिती कक्षाची विशेष व्यवस्था केली होती.

भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटनस्थळे बंद !

पुणे – सध्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भीमाशंकर अभयारण्यातील धोकादायक पर्यटनस्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र क्र. १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांनी दिली. यामध्ये कोंढवळ धबधबा, नागफणी पॉईंट, कोकण खडा आणि अभयारण्यातील इतर धोकादायक ठिकाणांचा समावेश आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षितता सुनिश्चित झाल्यानंतरच ही पर्यटनस्थळे खुली करण्यात येतील, असेही वनविभागाने सांगितले.

पुढील काही दिवस कोकणात जाणारा ताम्हिणी घाट बंद !

मुळशी तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीचा फटका पुणे-कोलाड महामार्गाला बसला आहे. ताम्हिणी घाट माथ्यावर झालेल्या मुसळधार पावसाने पळसे ते डोंगरवाडी मार्गात ३ ते ४ ठिकाणी रस्त्याची हानी झाली आहे. डोंगरवाडीजवळ पाणी असल्याने वाहतूक बंद केली आहे. ताम्हिणी ते दावडी भागात डोंगरावर केलेल्या उत्खननाने मातीचा ढिग रस्त्यावर आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणात जाणारा ताम्हिणी घाट बंद असेल.

पुणे शहरातील महापालिकेच्या १०१ शाळांना थेट रविवारपर्यंत सुटी घोषित !

पुणे – आळंदी आणि देहू या ठिकाणी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे वारकर्‍यांची रहाण्याची सोय पुणे शहरातील पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या १०१ शाळांना पुढील आठवडाभर सुटी देण्यात आली आहे; मात्र शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खासगी शाळा या कालावधीत चालू रहाणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

अतीवृष्टीमुळे भीमाशंकर मंदिराभोवती पाण्याचा वेढा !

पुणे – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वर्ष २०२७ मध्ये होणार्‍या नाशिक येथील कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे चालू आहेत. त्यामुळे मंदिर ५ महिन्यांपासून बंद होते. १५ जूनपासून काही नियम आणि अटींसह मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले; मात्र मंदिर परिसरात बांधकामाचा असलेला राडारोडा आणि साहित्य यांमुळे पायरी मार्ग अन् इतर भागांतून येणार्‍या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने मंदिर परिसरात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करतांना अडचण निर्माण होत आहे.