‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी ! – राजेंद्र चोरगे, अध्यक्ष, गुरुकुल शिक्षणसंस्था

(‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’ हे कार्बोनेटेड कॅफिनयुक्त पेय आहे.)

सातारा, ६ जून (वार्ता.) – ‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’मुळे मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे. असे पेय मोठ्या व्यक्तीच्या शरिरावरही काही प्रमाणात दुष्परिणाम करते. त्यामुळे या ‘स्टिंग एनर्जी ड्रिंक’वर सरकारने थेट बंदी घालावी, अशी मागणी गुरुकुल शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. राज्यात लाखो शाळा आणि कोट्यवधी विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक दुकान अन् प्रत्येक विद्यार्थी यांवर सतत लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागते आणि मोठा व्यय होतो. त्यामुळे सरकारने सर्वच जनतेच्या हितासाठी अशा ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या निर्मिती आणि विक्री यांवर निर्बंध घालावेत. अशा उत्पादनांचे विज्ञापन करणार्‍या आस्थापनांवरही कठोर निर्बंध आणावेत. विज्ञापनांवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणाला सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

संपादकीय भूमिका

आरोग्यावर दुष्परिणाम करणार्‍या सर्वच थंड पेयांवर बंदी का आणली जात नाही ? अशी मागणी का करावी लागते ? मुलांच्या आरोग्याला घातक असणारी पेये बाजारात विक्रीसाठी यायला नकोत, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे !