पालखी मुक्कामी असतांना पुण्यातील पाणी कपात रहित ! – महापौरांची घोषणा

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे मुक्कामी असतांना शहरातील पाणी कपात पूर्णपणे रहित करण्यात आली असल्याची घोषणा महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी केली. वारीच्या कालावधीत वारकर्‍यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून विशेष उपक्रमही राबवले जात आहेत. पुणेकर आणि मंडळे यांनी वारीच्या मार्गावर डीजे अन् स्पीकर लावू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवण्याच्या सूचना नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या. यासह पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मॅनहोल (गटाराचे उघडे झाकण) संदर्भात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष बैठक घेण्यात आली असून काळजी घेतली जात असल्याचे महापौरांनी बैठकीत स्पष्ट केले. ‘सेवा वारी’ या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरातील साडेचार लाख विद्यार्थी एकत्र येणार आहेत.