राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

  • दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्ग ठप्प

  • रुळांवर पाणी साठल्याने मुंबई रेल्वेसेवा कोलमडली

  • आळंदीत इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

  • ८ जुलैपर्यंत अतीदक्षतेची चेतावणी

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड

मुंबई – राज्यात ६ जुलै या दिवशी अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा परिसराला मोठ्या प्रमाणात बसला. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, वाहतूक विस्कळीत होणे, पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे आदी घटना घडल्या. अनेक शहरांमधील नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली. त्याचा परिणाम तेथील जनजीवनावर झाला. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडसह काही जिल्ह्यांना अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.

चाकण येथे रस्त्यावर आलेले पाणी

मुंबई – मुंबईत चाळीचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू

१. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरे येथील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत मानखुर्दमधील जनतानगर परिसरात ५ जुलैच्या रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळला. यात ५ लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण घायाळ झाला. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतांनाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळले.

२. यासह मुसळधार पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही उपनगरीय रेल्वेमार्गांवरील लोकलगाड्या काही मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे लाखो प्रवाशांची गैरसोय झाली. काही प्रवासी रेल्वेस्थानकांतच अडकले.

३. हवामान विभागाने मुंबईसाठी अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने मुंबईतील सर्व सरकारी, खासगी, महानगरपालिका, तसेच अनुदानित शाळा आणि महाविद्यालये यांना सुटी घोषित करण्यात आली.

पुणे  – ‘मिसिंग लिंक’ आणि रेल्वे मार्गावर दरड कोसळली : मुंबई-पुणे वाहतूक ठप्प !

१. मुंबई-पुणे महामार्गावर नव्याने सिद्ध केलेल्या ‘मिसिंग लिंक’जवळ मोठी दरड कोसळली. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ मार्ग बंद करण्यात आला. महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले असून ‘फूड मॉल’च्या परिसरात पाणी शिरले. केवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गच नव्हे, तर जुना मुंबई-पुणे महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला.

२. लोणावळ्याजवळ रूळावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे सेवाही पूर्णपणे ठप्प झाली. ‘परिस्थिती गंभीर असल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी पुणे-मुंबई या मार्गांवरील येण्या-जाण्याचा प्रवास टाळावा’, असे आवाहन प्रशासनाने केले.

३. अतीवृष्टीमुळे मावळ प्रांतातील विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून गावातील एक कुटुंब त्याखाली गाडले गेले. यात पती-पत्नी आणि एक मुलगा यांचा समावेश आहे. येथे साहाय्य कार्यसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे साहाय्य घेण्यात आले.

४. पुणे-नाशिक महामार्गांवर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर पाण्याचा प्रवाह येत असल्याने काही ठिकाणी वाहतूक संथगतीने चालू होती, तर काही ठिकाणी ती ठप्प झाली होती. पुणे-नाशिक महामार्गावरील अनेक रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.

आळंदीत चार पूल बंद : सहस्रो वारकरी अडकले

इंद्रायणी नदीचे रौद्र रूप

मुसळधार पावसामुळे आळंदीच्या इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी सातत्याने वाढत असल्याने येथील चारही पूल बंद करण्यात आले आहेत. परिणामी येथे आषाढी वारीसाठी आलेले सहस्रो वारकरी येथील विविध धर्मशाळा, तसेच दर्शन मंडप येथे अडकले होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे. ‘नदीचे पाणी सातत्याने वाढत असल्याने भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिक यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे’, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

कोकण – कोकणात मुसळधार पाऊस : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावरी दरड हटवण्याचे चालू असलेले काम

१. कोकणात गेल्या ३ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात ५ जुलैच्या उत्तररात्री २.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल अनुसयाजवळ (खवटी) एक भलीमोठी दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस, महामार्ग प्रशासन, महसूल विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकांनी ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर चालू केले. १२ घंट्यांनंतर महामार्गाची एक बाजू वहातुकीसाठी चालू करण्यात आली आहे.

२. खेड येथील येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेडची मुख्य बाजारपेठ १५ घंट्यांहून अधिक काळ पाण्याखाली असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला आहे. सद्य:स्थितीत नदीची पाणीपातळी हळूहळू ओसरत असली, तरी सखल भागांत आणि बाजारपेठेत अजूनही पाणी साचलेले आहे.

८ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांसाठी अतीदक्षतेची चेतावणी ! – मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या परिस्थिवर आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात बैठक घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘संपूर्ण जुलै महिन्याचा पाऊस या ४ दिवसांत पडला आहे. ८ जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांसाठी अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेथे ७ जुलैला अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर  पडलेला १०० टन ढिगारा हटवण्याचे  काम चालू आहे. आषाढी वारीसाठी वारकर्‍यांनी आळंदीत न जाता पुण्यातच थांबावे.’’