पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी

गारठा आणि पावसाळा यांमुळे वाढलेली सांधेदुखी अन् पाठदुखी इत्यादी तक्रारींसाठी नेहमीच्या गोष्टी सगळ्यांना ठाऊक असतात; पण खालील काही सूत्रे लक्षात घ्या –

१. पोटात गॅसेस (वायू) होतील, असे पदार्थ पूर्ण टाळावे. यामुळे आलेले आतड्यातील ताण कंबर आणि पाय यांवर येतांना दिसतात. ज्यांना पूर्वी कधीतरी त्रास झाला आहे, ज्यांचे पोट नाजूक आहे, ज्यांचा व्यायाम फारसा नसतो, अशांनी तर विशेष करून काळजी घ्यावी. यामध्ये मोठ्या आकाराची कडधान्ये जसे राजमा, छोले, पावटा, वाटाणा विशेष करून टाळावे. काकडी, गाजर, बीट हे पदार्थही टाळावेत. घशाशी येऊ शकेल, असे पदार्थ टाळावेत. यामध्ये बेसन (डाळीचे पीठ), हिरवी मिरची, ढोबळी मिरची, हॉटेलमध्ये साठवून मग जेवणात वाढण्यात येणार्‍या (सर्व्ह केल्या जाणार्‍या) पंजाबी ‘ग्रेव्ही’ (रस्सा) टाळाव्यात.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

२. पोटात वायू धरून त्याचा ताण पाठीच्या स्नायूंवर येतो. अशा वेळी खांदे किंवा पाठ चोळली असता ढेकर येऊन वायू सुटतो आणि रुग्णाला बरे वाटते. असे त्रास विशेष करून ज्येष्ठ नागरिक, पोट ठीक नसणारे लोक, भूक अल्प लागणार्‍या व्यक्तींमध्ये दिसतात. त्यांनी सुंठ आणि कोमट पाणी; ओवा अन् कोमट पाणी प्यावे. आले-सैंधव घालून केलेले पाचक पाणीही अधूनमधून घेता येईल. पाव ते अर्धा चमचा आल्याचा रस अर्धा ते एक कप पाण्यात घालून वरून थोडे सैंधव किंवा पादेलोण घालून प्यावा. मध घालून केलेले पदार्थ किंवा मध घालून प्यायलेले पाणी याचा उल्लेख आढळला, तरी सध्याच्या काळात शुद्ध मधाची खात्री नसल्याने हे समुपदेशन मी करत नाही. ज्यांना खात्रीशीर शुद्ध मध उपलब्ध असेल, त्यांनी आहारात खायला हरकत नाही (दिवसाला एखादा चमचा).

३. स्त्रियांमध्ये अंतर्वस्त्रे ओली राहून अंगावरून पांढरे जाणे किंवा मूत्रमार्गाचे संसर्ग या काळात अधिक प्रमाणात होतांना दिसतात. पुरुषांनाही या काळात ‘फंगल इन्फेक्शन’ (बुरशीजन्य संसर्ग) असण्याचे धोके वाढतात. पुरुषांमध्ये लक्षणे व्यक्त झाली नाहीत, तरी शरीर संबंध झाल्यावर स्त्रीला हे त्रास होतांना दिसतात. यामध्ये कंबरदुखी हे लक्षण प्राधान्याने दिसते. अचानक चालू झालेली कंबरदुखी असल्यास आपल्यात ही लक्षणे नाहीत ना, याचा विचार करावा. लघवीला साफ होत नसल्यास धने-जिरे पाणी घ्यावे. मूत्रप्रवृत्तीनंतर हलक्या हाताने तो भाग टिपून घ्यावा. जोरजोरात घासणे टाळावे.

४. भ्रमणसंगणकावर सतत काम असलेल्या लोकांनी मधून मधून मानेचे व्यायाम करावे. भ्रमणसंगणक मांडीवर न ठेवता टेबलवर उंचीवर ठेवणे किंवा एखादा मोठा ‘मॉनिटर’ लावून घेणे, असे उपाय नेहमीसाठीच करून घ्यावे. मानेला तेल लावणे, आम्लपित्त आटोक्यात ठेवणे, ‘पोश्चर’ (शरिराची ठेवण) सांभाळावे. पाठीला आणि कंबरेला उशीचे योग्य साहाय्य द्यावे.

५. या काळात व्यायाम जपून करावा. श्वासाच्या गतीमध्ये वाढ आणि थोडा घाम आल्यावर व्यायाम थांबवावा. प्रतिदिन करता त्यापेक्षा थोडा न्यून व्यायाम करावा. लहानपणी केलेल्या शारीरिक कवायतीच्या हालचाली मात्र अवश्य कराव्यात. त्याने रक्ताभिसरण चांगले रहाते आणि अचानक पाठ आखडणे किंवा मान लचकणे, हे होण्याची शक्यता नगण्य राहते.

६. अचानक केलेल्या हालचाली टाळाव्यात. पूर्वी वयाच्या ५० वर्षी दिसणारे त्रास आता वयाच्या ३५ व्या वर्षीच दिसू लागले आहेत. पटकन वजन उचलणे, पटकन उठणे, एखादी वस्तू काढण्यासाठी पटकन खाली वाकणे, अशा वेळी पाठ आखडण्याचे प्रसंग होतात. लहान वयापासून नियमित योगासने करणार्‍या लोकांमध्ये मात्र या गोष्टी फारच क्वचित् होतात.

वरील काही सूत्रांनुसार काळजी घ्यावी. स्त्रिया, गाडीवर प्रवास असणारे लोक, उभ्याने काम असणारे आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष करून काळजी घ्यावी.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (३.७.२०२६)