पावसामुळे राज्यातील दळणवळणावर परिणाम

पुणे-मुंबई एस्.टी. बस सेवा बंद !

मिसिंग लिंक मार्गावर दरड कोसळल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची एस्.टी. बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे पुणे बसस्थानकातून सुटणार्‍या अंदाजे ५० फेर्‍या रहित करण्यात आल्या होत्या. प्रवाशांनी तिकिटे काढूनही सेवा रहित झाल्याने त्यांची गैरसोय झाली.


‘मिसिंग लिंक’ मार्गाची सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून पहाणी !

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘मिसिंग लिंक’ मार्गाची पहाणी केली. ते म्हणाले, ‘‘बोगद्याच्या संरचनेला कोणताही धोका नाही. दरड हटवल्यावर वाहतूक कधी चालू करायची ?, हा निर्णय पोलीस घेतील. पाऊस अल्प झाल्याविना सर्व गोष्टी पडताळता येणार नाहीत. त्यानंतर पुढील उपाययोजना करू.’’


राज्यातील पावसाच्या अन्य घडामोडी !

  • आतापर्यंत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध दुर्घटनांत १३ जणांचा मृत्यू झाला.
  • मुंबईत पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसवले आहेत; पण पावसाच्या वेगामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत होता.
  • मुंबई-गोवा महामार्गावरही सुकेळी घाटात ३ फूट पाणी साचल्याने अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोलमडली होती. अनेक वाहने पाण्यात अडकूनही पडली होती.
  • महाड येथे महामार्गावर शेकडो वाहने पुरात अडकू नयेत म्हणून उभी करण्यात आली होती.
  • रायगडमध्ये बल्लाळेश्वर मंदिराच्या सभागृहात पाणी साचले होते.
  • पनवेल येथील गाढेश्वर धरण परिसरात २ तरुणांचा ओढ्यात बुडून मृत्यू झाला. डोंगररांगांमधील मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यातून ही दुर्घटना घडली.
  • कल्याण येथे घराचे छत कोसळून १ महिला घायाळ झाली.
  • ठाणे आणि वाशी येथे सोसाट्याच्या वार्‍यामुळे होर्डिंग कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
  • महाबळेश्वर येथे वेण्णा नदीवरील पूल तुटला.
  • उरणमध्ये चक्रीवादळाचा फटका बसून एका जहाजामधील कंटेनर उडून गेला. या अपघातात टँकरवर काम करणारे ३ कामगार घायाळ झाले असून एकाचा मृत्यू झाला.
  • सीबीडी बेलापूर येथे मेट्रोच्या खांबाच्या ठिकाणी दरड कोसळली.
  • ठाणे, कल्याण-डोंबिवली, टिटवाळा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील सखल भागांत पाणी साचले. काशिमीरा भागात एका २४ मजली इमारतीवरून पेव्हर ब्लॉक पडल्याने ४ जण घायाळ झाले, तर भाईंदर येथे स्कायलाईन या इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाला.
  • रायगडमधील २८ धरणांमधील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वसई-विरार शहरात पूर !

मुंबई – वसई-विरार शहरातही मुसळधार पावसामुळे पूर आला होता. सर्वत्र पाणी असल्याने कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेवटी हताश झालेल्या प्रवाशांना वसई ते नालासोपारा यांच्या मधून रेल्वे रुळांवरूनच पायी प्रवास करावा लागला. पावसामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने शहरात आली नाहीत. त्यामुळे दूध आणि भाजीपाला यांची टंचाई निर्माण झाली. शहरातील अनेक सखल भागांतील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्‍यांची पुष्कळ हानी झाली. वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालय परिसर जलमय झाला होता.

वसईतील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. सलग १० ते १२ घंटे वीजपुरवठा खंडित होता. नेटवर्क, इंटरनेट सेवा ठप्प होत्या. एका गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळली.


पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस !

जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ !

पवना, मुळा-मुठा नद्यांना पूर

पिंपरी चिंचवड – मागील २ दिवसांपासून सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दत्तनगर येथील बिर्ला रुग्णालयाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने डांगे चौक–चिंचवड मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बिर्ला रुग्णालय चौकात वाहतूक रोखण्यात आली असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुळा-मुठा नदीला आलेल्या पुरामुळे संगम वाळकी (ता. दौंड) येथील पूल या वर्षी प्रथमच पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाळकी आणि देलवडीचा संपर्क तुटला आहे. भीमा नदीपात्र दुथडी भरून वहात आहे. पूरजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये ‘रेड अलर्ट’ (उच्च धोका) घोषित करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील १ सहस्र ८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर !

पिंपरी-चिंचवड शहरात अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने १ सहस्र ८८० नागिरकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. पूरबाधितांसाठी महापालिकेने विविध ठिकाणी निवाराकेंद्रे सिद्ध केली आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले

पिंपरी-चिंचवड परिसरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. पुराचे पाणी वाढल्यामुळे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरातील उत्सवमूर्ती श्री मंगलमूर्ती वाड्यात हालवली.

चिखली डिफेन्स कॉलनी आणि गावठाण परिसरातील अनुमाने १०० कुटुंबांना तातडीने महापालिकेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. याशिवाय केशवनगर, आंबेडकर कॉलनी, भाटनागर आणि रिव्हर रोड परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

डांगे चौक–चिंचवड मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद !

पुणे – मुसळधार पावसाने शहर, तसेच शहराजवळील अनेक भागांत रस्ते बंद झाले. पिंपरी-चिंचवड, हडपसर, सिंहगड रस्ता, कोथरूड, गावठाण भाग येथील काही भागांत रस्त्यांवर, तसेच पुलांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. निगडीतील भेळ चौक परिसरात एका गृहप्रकल्पाची संरक्षण भिंत कोसळून एक कामगार गंभीररित्या घायाळ झाला असून शहरातील ४५ हून अधिक ठिकाणी घरांमध्ये आणि भुयारी मार्गात पाणी साचले आहे. शहरातील संभाजीनगर, भोसरी, निगडी, आकुर्डी, त्याचप्रमाणे पिंपरीतील संत तुकारामनगर, दापोडी, चिंचवड आणि डुडूळगाव अशा ११ ठिकाणी, तसेच पूर्ण शहरात एकूण ३० हून अधिक ठिकाणी झाडे पडली. खेड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस चालू आहे. ६ जुलैला सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड पाणी आल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. भीमाशंकर परिसरात ५५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. मावळ तालुक्यातील पाटण गावात ६ जुलैच्या पहाटे एका घरावर दरड कोसळल्याने संपूर्ण कुटुंब ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अन्य

१. दौंड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले होते. गेले ३ दिवस दौंड तालुक्यात दिवसभर पाऊस असल्याने सर्व गुर्‍हाळघरे आणि वीट भट्टी व्यवसाय, शेतातील सर्व कामे बंद होती.

२. थेरगाव येथील केजुदेवी बंधाराही भरून वहात असून पवना नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

३. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास २४ घंट्यांमध्ये धरण ८० टक्के भरण्याची शक्यता आहे.

४. खेड तालुक्यातील रेटवडी येथील खालची ठाकरवाडी परिसरातील समीर जाधव हा तरुण पुलावरून जातांना पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


कृष्णा आणि उपनद्यांवरील ‘उपसा बंदी’ शिथिल !

सातारा – जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि तिच्या कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी, वांग, उत्तरमांड आणि कोयना या उपनद्यांवरील सिंचनासाठीच्या पाणीपुरवठा योजनांवर लागू करण्यात आलेली ‘उपसा बंदी’ शिथिल करण्यात आली आहे, असे माहिती पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे.

ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे तालुकानिहाय यंत्रणांशी संवाद साधून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला.

कारी गावातील शाळेच्या भिंती कोसळल्या

कारी गावात जिल्हा परिषदेची शाळेच्या भिंती कोसळल्या आहेत. शाळेवरील पत्रे उडून गेले असून वर्गांमध्ये पाणी शिरून कागदपत्रांची हानी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ११, वाई तालुक्यातील १७ लोकांचे नातेवाइकांकडे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यात पाटण, सातारा, खंडाळा या तालुक्यांतील २४ घरांची पडझड झाली आहे, ताथवडे घाटात दगड सैल होऊन गाडीवर पडल्याने फलटण तालुक्यातील एक व्यक्ती मृत झाली आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यात जलसंकट निर्माण झाले होते. राज्यातील धरणांमध्ये पिण्यासाठी पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत सिंचन प्रकल्पांसाठी ‘उपसा बंदी’ लागू केली होती; मात्र काही दिवसातच पावसाने दमदार प्रारंभ केल्याने पिण्याच्या पाण्यासमवेत सिंचनासाठीही पाणी धरणांमध्ये जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळाकडून वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार संबंधित विभागीय आणि उपविभागीय कार्यालयांना ‘उपसा बंदी’ शिथिल करण्याविषयी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


आपत्कालीन साहाय्यासाठी सरकारकडून संपर्क क्रमांक प्रसारित !


मुंबई –
संभाव्य मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती यांच्या पार्श्वभूमीवर साहाय्यासाठी राज्यशासनाने संपर्क क्रमांक प्रसारित केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने साहाय्य मिळावे, यासाठी आपत्कालीन यंत्रणा २४ घंटे सज्ज आहे’, असे सांगितले आहे.

राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०७० हा टोल-फ्री क्रमांक आहे. साहाय्यासाठी नागरिकांना ०९३२१५८७१४३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा ०२२-२२०२७९९० आणि ०२२-२२७९४२२९ या दूरध्वनी क्रमांकांवरही थेट संपर्क साधता येईल. जलदगतीने साहाय्य करण्यासाठी आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षही सज्ज ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवरही साहाय्यासाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. या सर्वांचा मुख्य संपर्क क्रमांक १०७७ असा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

पंचगंगेची पाणीपातळी ३४ फूट : प्रशासनाचे पूर्ण लक्ष ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी

पंचगंगा नदी

कोल्हापूर, ६ जुलै (वार्ता.) – अतीवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ३४ फूट असून नदीचे पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. नदीची चेतावणी पातळी ३९ फूट असून सध्यातरी चिंता करण्यासारखी स्थिती नाही. सर्व परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे. बेळगाव, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. कर्नाटक येथील आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग, तसेच अन्य माहिती नियमितपणे मिळते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘संभाव्य पूरस्थितीचा विचार करून प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून एन्.डी.आर्.एफ्.चे (राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे) पथक सिद्ध आहे. पूरस्थिती उद्भवल्यास करावयाच्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. राधानगरी धरण ४२ टक्के भरले आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे तिथे योग्य त्या उपाययोजना प्रशासन करत आहे.’’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत सूत्रांकडून येणार्‍या माहितीचा आधार घ्यावा आणि संकटसमयी घोषित केलेल्या अधिकृत ‘हेल्पलाईन’ क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा !

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

घरून काम करण्याच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करणार ! – मुख्यमंत्री

मुंबई – मुसळधार पावसामुळे आवश्यकता असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे, तसेच कर्मचार्‍यांनी घरून कार्यालयाचे काम करावे. जी आस्थापने या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.


मुंबईतील शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांना अर्ध्या दिवसाची सुटी घोषित !

मुंबई – मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूरस्थिती यांमुळे मुंबईमध्ये अतिधोकादायक स्थिती (रेड अलर्ट) घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्‍यांना ६ जुलै या दिवशी अर्ध्या दिवसाची सुटी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. अनेक खासगी कार्यालयांनीही कर्मचार्‍यांना घरी राहून काम करण्याचे आवाहन केले आहे.


सुरक्षेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अथवा तेथून पुढे सहभागी व्हावे ! – पुणे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

पुणे – मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात ६ जुलैला ‘अतीदक्षतेची चेतावणी’ दिली होती. त्याप्रमाणे देहू आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणीसाठा वाढला आहे. ७ जुलैला देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ८ जुलैला आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे पालखी प्रस्थान होणार आहे. तरी सुरक्षेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दीपर्यंत अथवा तेथून पुढे सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे जिल्हाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.