आजपासून महाराष्ट्रात ‘पालखी सोहळा’ चालू होत आहे. त्या निमित्ताने…
वारी ही केवळ पंढरपूरपर्यंतची पायी यात्रा नाही, तर ती मन शुद्ध करणारी, शरीर सुदृढ करणारी, समाजाला एकत्र आणणारी आणि विठ्ठलभक्ती वाढवणारी जीवनयात्रा आहे. म्हणूनच लाखो वारकरी प्रतिवर्षी आनंदाने म्हणतात, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ।’, ‘रामकृष्ण हरि ।’

आभाळ दाटून आले की, वारीची आठवण होते. आषाढ मासाची चाहूल लागते, काळेभोर ढग आकाश व्यापून टाकतात आणि मंद वार्यासह पावसाच्या सरी बरसू लागतात. अशा वेळी प्रत्येक वारकर्याच्या मनात एकच भावना जागी होते, ती म्हणजे वारी ! वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तर ती श्रद्धा, भक्ती, समर्पण आणि प्रेम यांचा अखंड सोहळा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने निघतात. पावसाच्या सरी अंगावर झेलत, चिखल तुडवत आणि हरिनामाचा गजर करत चालणारी ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे.
वारी म्हटले की, डोळ्यांसमोर भगव्या पताका फडकतांना दिसतात. टाळ-मृदंगाचा नाद कानात घुमू लागतो. ‘रामकृष्ण हरि’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामघोषाने आसमंत दुमदुमून जातो. वारकर्यांच्या चेहर्यावरचा आनंद, त्यांच्या पायातील जिद्द आणि विठ्ठल भेटीची ओढ मनाला भावूक करून जाते. वारीत ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया ।’, अशी हाक दिली जाते. वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते. श्रीमंत-गरीब, लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता सर्वजण विठ्ठलाच्या नामात रंगून जातात. म्हणूनच वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा आहे.

वारीचे लाभ
वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाची एक अनोखी शाळा आहे.
१. आध्यात्मिक लाभ : विठ्ठलभक्ती दृढ होते. नामस्मरण, भजन आणि कीर्तन यांमुळे मन प्रसन्न रहाते. संतांचे विचार आणि शिकवण जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा मिळते. स्वतःतील अहंकार न्यून होऊन नम्रता वाढते.
२. मानसिक लाभ : मनातील ताणतणाव न्यून होतो. सकारात्मक विचारांची वाढ होते. आत्मविश्वास आणि मनःशांती प्राप्त होते, तसेच संयम अन् सहनशीलता वाढते.
३. शारीरिक लाभ : नियमित चालण्यामुळे शरीर सुदृढ रहाते. पायांची आणि शरिराची सहनशक्ती वाढते. आरोग्य सुधारते आणि व्यायामाची सवय लागते. शिस्तबद्ध दिनचर्या अंगीकारली जाते.
४. सामाजिक लाभ : समता, बंधुभाव आणि एकता यांची भावना निर्माण होते. जात, पंथ, श्रीमंत-गरीब यांचे भेद विसरून सर्वजण एकत्र येतात. समाजातील विविध घटकांशी संवाद वाढतो. सेवाभाव आणि परस्पर सहकार्याची वृत्ती विकसित होते.
५. सांस्कृतिक लाभ : महाराष्ट्राची संतपरंपरा आणि संस्कृती जपली जाते. अभंग, भारूड आणि कीर्तन यांचा वारसा पुढील पिढीकडे पोचतो. भारतीय संस्कृतीतील नैतिक मूल्यांचे संवर्धन होते.
– ह.भ.प. धनंजय जगताप, युवा कीर्तनकार, आळंदी, जिल्हा पुणे.
‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद
‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा
पावसाळ्याच्या काळात वाढत असलेली सांधेदुखी आणि पाठदुखी यांविषयी घ्यावयाची काळजी
सुख-दु:खाच्या जीवनात आनंदप्राप्तीचे सत्य !
‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पताका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ !
आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !