पाकिस्तानात आतंकवादी रियाज भटकळ याची हिंदु गुंडांनी करवून आणली हत्या !

माजी पोलीस अधिकारी राजेश पांडे यांच्या ‘अंतहीन’ पुस्तकात गुंड बबलू श्रीवास्तव याच्या हवाल्याने दावा

माजी अधिकारी राजेश पांडे

नवी देहली – भारतीय पोलीस सेवेतील (इंडियन पोलीस सर्व्हिस) माजी अधिकारी राजेश पांडे यांच्या ‘अंतहीन’ या पुस्तकात गुंड बबलू श्रीवास्तव याच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की, इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी रियाज भटकळ याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. बबलू याचा दावा आहे की, त्याने स्वतः त्याच्या लोकांकडून ही हत्या घडवून आणली होती. राजेश पांडे जेव्हा बरेली (उत्तरप्रदेश) येथे पोलीस महानिरीक्षक होते, तेव्हा बबलू बरेलीच्या कारागृहात बंद होता. त्या वेळी राजेश पांडे यांनी त्याची चौकशी केली होती. तेव्हा त्याने ही माहिती दिली होती, असे या पुस्तकात म्हटले आहे.

वर्ष २००३ ते २००८ या काळात इंडियन मुजाहिदीनने देशभरात अनेक ठिकाणी बाँबस्फोट घडवून आणले होते. स्फोटांशी संबंधित या सर्व गुन्ह्यांमध्ये अनेक आतंकवाद्यांना अटक करण्यात आली; मात्र या स्फोटांचा मुख्य सूत्रधार रियाज आणि इक्बाल भटकळ हे नेपाळच्या मार्गाने पाकिस्तानात पळून गेले होते. त्यांनीच या आतंकवादी संघटनेला ‘इंडियन मुजाहिदीन’ असे नाव दिले होते.

छोटा राजन यानेही केला होता दावा

६ नोव्हेंबर २०१५ या दिवशी गुंड छोटा राजन याला अटक होण्यापूर्वी त्यानेही असा दावा केला होता की, रियाज भटकळ याची पाकिस्तानात त्याच्या माणसांनी हत्या केली होती. पुस्तकात राजेश पांडे यांनी लिहिले आहे की, वर्ष १९९३ च्या मुंबईतील बाँबस्फोटानंतर गुन्हेगारी जगतात हिंदु-मुसलमान या आधारावर जे २ गट पडले होते. आतंकवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानात आय.एस्.आय.च्या (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणेच्या) नियंत्रणात होता आणि त्याचे विरोधी हिंदु गटातील छोटा राजन, सुभाष ठाकूर, बबलू श्रीवास्तव, पी.पी. पांडे उपाख्य बंटी पांडे भारतीय कारागृहात होते. जुन्या खटल्यांमध्ये या सर्वांना शिक्षा झाली. सर्व जण आजही जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत

भारतीय यंत्रणांना साहाय्य केल्याचा गुंडांचा दावा

१. राजेश पांडे यांच्या मते, वर्ष २०१५ मध्ये छोटा राजन तिहार कारागृहामध्ये आल्यानंतर या सर्वांचा कारागृहामध्ये असतांनाच परस्परांशी संपर्क झाला. उर्वरित लोकांनी बबलू श्रीवास्तव याचे ‘त्याने एकट्याच्या बळावर नेपाळमध्ये दाऊदचे पूर्ण जाळे संपवून टाकले’ या गोष्टीसाठी अभिनंदन केले. (असे म्हटले जाते की, दाऊदशी संबंधित असलेल्या नेपाळी खासदार मिर्झा दिलशाद बेग यांच्या हत्येच्या कटातही बबलू श्रीवास्तव याचा हात होता)

२. बबलूने सर्वांना सांगितले की, दाऊदसोबत जे लोक पाकिस्तानात पळून गेले आहेत, त्यांनाही संपवणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांना एक व्हावे लागेल.

३. बबलू श्रीवास्तव याने पुढे म्हटले की, नेपाळमधील जाळे संपवताना जे लोक पाकिस्तानात पळाले होते, त्यांना पाकमध्येही त्यानेच ठार केले. यांमध्ये महंमद शरीक उपाख्य छोटा दाऊद, सगीर अहमद, रियाज भटकळ, अन्वर खान यांच्यासह अनेक मोठ्या आतंकवाद्यांचा समावेश होता.

४. ‘आजही मौलाना मसूद अझहर, सय्यद सलाहुद्दीन, तलहा हाफिज सईद, झकी उर रहमान लखवी, अमीर सरफराज तांबा ज्याने सरबजीत सिंह यांची हत्या केली होती, हे सर्व त्यांचे जाळे पाकिस्तानात बसून चालवत आहेत. जोपर्यंत दाऊद संपत नाही, तोपर्यंत आमचा सूड पूर्ण होणार नाही; कारण तो देशाविरुद्ध काम करत आला आहे आणि आय.एस्.आय.च्या सांगण्यावरून भारताची मोठी हानी केली आहे. म्हणूनच आपल्याला सर्वांना एक होऊन भारतीय यंत्रणांना साहाय्य करावे लागेल’, असे बबलू श्रीवास्तवर याने कारागृहातील सर्वांना सांगितले होते.

५. पुस्तकानुसार सर्व गुंड या गोष्टीवर सहमत झाले; कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कारागृहामधून सुटण्याची कोणतीही शक्यता नव्हती आणि कारागृहामध्ये त्यांना छोट्या-मोठ्या सुविधाही हव्या होत्या.

६. यंत्रणांना साहाय्य करण्याच्या बदल्यात स्थानिक प्रशासनाकडून चांगले जेवण, बॅरेकमध्ये वेगळे रहाणे, टीव्ही पहाणे आणि डॉक्टरांकडून उपचार करून घेणे अशा चांगल्या सुविधा त्यांना मिळू शकत होत्या.