सौ. अरुंधती महाडिक यांच्याकडून इतिहास आणि पाककृती एकत्र असलेल्या पुस्तकाची निर्मिती !

‘वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद’, या पुस्तकाची माहिती देतांना सौ. अरूंधती महाडिक (उजवीकडे), तसेच अन्य मान्यवर

कोल्हापूर, ६ जुलै (वार्ता.) – ‘भागीरथी संस्थे’च्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून मराठी पुस्तक विश्वात नवी भर पडली आहे. सौ. महाडिक यांचे माहेर असलेल्या फलटण येथील ‘वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि स्वाद’, या नावाचे एक सुंदर अन् माहितीपूर्ण पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात सौ. अरुंधती महाडिक यांच्या घरातील एकत्र कुटुंबपद्धत, शिस्त-संस्कृती-माणुसकी आणि एकोपा यांची शिकवण आहेच. नाईक-निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक आणि खानदानी पाककलांना उजाळा मिळाला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शाहीर राजू राऊत, विशाल कुमठेकर, ‘अक्षर दालन’चे अमेय जोशी उपस्थित होते.

या संदर्भात अधिक माहिती देतांना सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या, ‘‘आमचे नाईक-निंबाळकर घराणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी संबंधित आहे. तत्कालीन मराठा साम्राज्यामध्ये वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्याचे आणि परिवाराचे योगदान यांसह अनेक महत्त्वाची माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्ताऐवज न रहाता, इतिहासकालीन सत्यतेची मांडणी करत वाचकांना गुंग करते. फलटण वाठारच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील अनेक पिढ्यांनी १६ व्या शतकापासून पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाचा थाट आणि संस्कृती जपली आहे. काळाच्या ओघात अनेक पदार्थ लुप्त झाले आहेत. अशा वेळी या पुस्तकामुळे चवीचा हा अनमोल ठेवा नव्या पिढीतील अन्नपूर्णा गृहिणींना समजणार आहे.’’

हे पुस्तक कोल्हापुरातील मंगळवार पेठ मधील ‘अक्षर दालन’मध्ये (संपर्क क्रमांक – ७७९६६४६४२३) आणि छत्रपती ताराराणी चौकानजीकच्या ‘भागीरथी महिला संस्थे’च्या कार्यालयामध्ये (संपर्क क्रमांक – ९६७३८१९२९२) येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.