‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !
आर्तता, व्याकुळता, तरलता, स्पष्टता, सहजता, मोहकता, सुंदरता, समरसता, एकरूपता, अखंडता अशा सर्व गुणांनी व्याप्त असलेले गोपीमन हे ईश्वराच्या सर्वश्रेष्ठ अशा अंगीभूत कार्यपैलूंनी भरलेले आहे. श्रीकृष्णतत्त्वाच्या सर्वविध गुणांची अष्टपैलूत्वाने साकारलेली व्याप्ती पहायची असेल, तर गोपीभाव अनुभवायला हवा, तरच श्रीकृष्णभेटीची खरी आस, आर्तता यांची अनुभूती येऊ शकते. भक्तीरसातील माधुर्यता म्हणजे गोपी, तर माधुर्यतेतील सहजता म्हणजे श्रीकृष्णभाव ! श्रीकृष्णभक्तीतील प्रेमरसमय उत्कटता, म्हणजे गोपीभाव ! गोपीभाव असणार्या साधक किंवा साधिका यांनी श्रीकृष्णाशी केलेला संवाद, म्हणजे परमात्म्याशी संवाद, म्हणजे सार्या ब्रह्मांडाला व्यापून उरणार्या हरिमनाचा ठाव घेणारा तो एक शुद्धस्वरूप आणि सतत सद्-चित्-आनंदात ठेवणारा शब्दविलास होतो.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – गोपींचे विविध भाव, अनुसंधान आणि ध्येय )

मधुराभक्तीचा अर्थ : रासक्रीडा हा कृष्ण आणि गोपी यांच्या जीवनातील एक मधुर प्रसंग आहे. ‘मधुरा’ म्हणजे ईश्वरावर प्रेयसीप्रमाणे प्रेम करणे. मधुराभक्तीमध्ये ‘भक्त आणि भगवंत’ यांच्यात ‘प्रियकर आणि प्रेयसी’ असे नाते असते. मधुराभक्तीद्वारे जीव ईश्वरावर प्रेम करत करत एके दिवशी स्वतःला विसरून जातो आणि पूर्णपणे भगवंताचा होतो. भक्ताला भगवंताशी जोडते ती भक्ती होय. म्हणूनच ‘मधुरा’ ही भक्ती आहे.
गोपी आणि राधा यांनी मधुराभक्तीद्वारे श्रीकृष्णाशी एकरूप होणे
‘श्रीकृष्णाच्या सर्व भक्तांमध्ये गोपी आणि राधा यांचे महत्त्व विशेष आहे. त्या मधुराभक्तीद्वारे श्रीकृष्णाशी एकरूप झाल्या होत्या. अनेकजण राधा-कृष्णाच्या संबंधाबाबत टीका करतात. श्रीकृष्णाबाबत बरे-वाईट बोलले जाते; परंतु संत कबीरांसारख्या अनेक संतांनी ‘गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ होती. तशी भक्ती कोणालाही करता आली नाही’, असे म्हटले आहे.
कबीर कबीर क्या कहे । जाओ जमूना तीर । इक गोपी के प्यार में । बह गये लाख कबीर ।। – संत कबीर
द्वापरयुगातील गोपींची श्रीकृष्णभक्ती किती उत्कट होती !

भक्ती ही ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी’, असे नारदमुनींनी म्हटले आहे. गोपींची प्रत्येक कृती कृष्णभावाने भरलेली असते. गोपींच्या कृतीच्या आरंभी कृष्ण असतो, कृतीमध्ये कृष्ण असतो आणि कृतीनंतरही कृष्ण असतो, तसेच त्यांची प्रत्येक कृती कृष्णासाठीच असते !
– (सद्गुरु) डॉ. मुकुल माधव गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, सनातन आश्रम, गोवा.
गोपींची वैशिष्ट्ये !
१. गोपींची सतत असणारी भावावस्था
गोपींचे श्रीकृष्णावर अपार प्रेम होते. जसे श्वास घेण्याची क्रिया आपोआप होते, त्याचप्रमाणे त्यांच्याकडून श्रीकृष्णाचे आपोआप स्मरण होत होते. त्यांच्या मनात सर्वत्र श्रीकृष्ण व्यापला होता. त्या सूक्ष्मातून, म्हणजेच मनाने सदैव त्याच्याच सेवेत होत्या. त्याच्या प्रेमामध्ये त्यांना स्वतःची शुद्ध विसरायला होत असे. त्यांना श्रीकृष्णाप्रती भाव वाढवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागले नाहीत. केवळ जागेपणी, म्हणजे जागृतावस्थेतच नव्हे, तर झोपेत म्हणजे सुषुप्तीत आणि तुर्यावस्थेतही त्यांना सतत श्रीकृष्णाचे स्मरण होत असे. हे स्मरण म्हणजे केवळ स्मरण नसून प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाला मारलेली हाक असायची गोपींच्या प्रेमात त्यांच्या सर्व देहांचा सहभाग होता. त्यांच्या मनात श्रीकृष्णाप्रतीचा भाव काही क्षण, काही घंटे किंवा काही दिवस न रहाता तो तसाच असायचा. भाव वाढलेला असल्यामुळे त्या फार अल्प काळ जीवदशेत वावरत होत्या. त्यांना भावावस्था प्राप्त झाली होती. भावावस्थेमुळे त्यांची प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती. भावावस्थेत त्यांना चैतन्य आणि आनंद सतत अनुभवता येत होता.’
२. गोपींनी भावातून भक्तीकडे जाणे
गोपींचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव वाढत जाऊन त्यांना भावावस्था प्राप्त झाली. भावावस्थेत त्यांना चैतन्य आणि आनंद मिळत होता, तरीही त्यांची कृष्णतत्त्वाशी एकरूप होण्याची ओढ वाढतच होती. त्यामुळे त्या अल्प काळात ८५ टक्क्यांहून अधिक अशा उच्च आध्यात्मिक पातळीला पोचू शकल्या. भावावस्थेकडून त्यांची वाटचाल भक्तीकडे झाली. भक्ती म्हणजे एकरूपता. गोपींमध्ये असलेल्या श्रीकृष्णाप्रतीच्या प्रचंड भक्तीभावामुळे त्या ‘भावावस्थेत’ न रहाता ‘भक्तीच्या’ टप्प्याला लवकर गेल्या.
– सुश्री मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संदर्भ : विविध गोपींचे भाव, अनुसंधान आणि ध्येय : खंड १)
सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झालेल्या गोपी !

गोपी म्हणजे सूक्ष्म-देहाने कृष्णतत्त्वाशी पूर्णतः एकरूप झाल्याचे एकमेव उदाहरण होय.
‘तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।’ – नारदभक्तिसूत्र, अध्याय १, सूत्र १९
अर्थ : दिवसभरातील सर्व क्रियाकलाप, आचारादी सर्व ईश्वरार्पित बुद्धीने, म्हणजे ‘त्याच्यासाठीच, त्याच्या प्रीतीसाठीच करतो’, अशी बुद्धी, भावना रहाणे आणि त्याचे विस्मरण झाले असता अत्यंत व्याकुळता, दुःख होणे, हे भक्तीचे एक द्योतक आहे.
(संदर्भ : विविध गोपींचे भाव, अनुसंधान आणि ध्येय : खंड १)
गोपींमध्ये असलेले गुण !
१. सेवावृत्ती : गोपींमध्ये श्रीकृष्णाप्रती पुष्कळ सेवाभाव होता. त्यामुळे त्या श्रीकृष्णाची केवळ शरीरानेच नव्हे, तर मन आणि बुद्धी यांद्वारेदेखील सेवा करत होत्या. त्यांनी श्रीकृष्णाच्या सेवेत स्वतःचा अहं पूर्णपणे अर्पण केला होता. त्यामुळे त्या २४ घंटे श्रीकृष्णाच्या सेवेत होत्या. त्या स्वप्नातही श्रीकृष्णाची सेवा करत होत्या. ७५ टक्के पातळीपर्यंत त्यांनी श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सेवा केली, तर ७५ टक्के पातळीनंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या निर्गुण रूपाची सेवा केली.
गोपींकडून एखादी चूक झाल्यास ‘आपल्याकडून होणारी प्रत्येक चूक म्हणजे आपण श्रीकृष्णाची सेवा करण्यास न्यून पडलो’, अशी त्यांना खंत वाटत असे. त्यामुळे ‘ती चूक पुन्हा होऊ नये’, असे त्यांना वाटत असे. ‘चूकही श्रीकृष्णच सूक्ष्मातून दाखवतो’, असा त्यांचा भाव होता. त्यामुळे लहान लहान चुकाही त्यांच्या लक्षात येत होत्या. त्यांची तळमळ आणि भाव पाहून श्रीकृष्णाचा त्यांच्यावर होणार्या मदतीचा आणि कृपेचा ओघ वाढत गेला. पातळी वाढल्यावर ‘सर्वकाही श्रीकृष्णच करत आहे’, अशा भावामुळे साक्षात श्रीकृष्णच त्यांच्या माध्यमातून कार्य करत होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येक कृती अचूक होत होती आणि त्यातून सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांचे प्रक्षेपण होत होते.
२. तीव्र साधना : ‘गोपींनी तीव्र साधना केली. त्यामुळे त्यांना अल्प अवधीत चैतन्य, आनंद आणि शांती हे टप्पे गाठता आले. गोपींना निर्गुणाची ओढ जास्त होती. त्यामुळे त्या लवकर माझ्याकडे पोचल्या.’
३. सर्वोत्तम शिष्या : सर्व गोपींमध्ये उत्तम शिष्याचे गुण होते. त्यामुळे श्रीकृष्णाच्या स्मरणापासून ते त्याची सेवा करण्यापर्यंत त्यांची प्रत्येक कृती अपेक्षाविरहित आणि पुष्कळ भावपूर्ण, म्हणजेच ती आध्यात्मिक स्तरावर होत होती. गोपींना अध्यात्म जगण्याची निराळीच कला अवगत होती. त्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर सदैव प्रसन्न होता. गोपींची (शिष्यांची) तळमळ आणि भाव पाहून श्रीकृष्णाने त्यांची जलद उन्नती करवून घेतली. गोपी श्रीकृष्णाच्या भक्तही होत्या आणि शिष्याही होत्या. श्रीकृष्ण केवळ देवतेचे कार्य करीत नसून तो गुरूंचेही कार्य करत होता. त्यामुळे श्रीकृष्णाला ‘जगद्गुरु’ म्हटले आहे.
४. अहं नसणे : गोपींचे सर्वांत आगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना अजिबात अहं नव्हता. श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रेम करत होता. त्यामुळे ‘आम्ही इतरांपेक्षा निराळ्या आहोत’, असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या मनात स्वतःविषयीचे विचार येत नव्हते, तर केवळ श्रीकृष्णाचेच विचार होते. त्यामुळे त्यांच्यात अहं नव्हता.
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
| श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी । हे नाथ नारायण वासुदेव ।।
हे राधे, तुझ्याप्रमाणेच आम्हाला सदैव अपार कृष्णप्रीतीत ठेव ! |
राधेच्या प्रीतीची वैशिष्ट्ये !

१. राधेला स्वेच्छा न उरणे
प्रत्येक गोपी संत होती, तर राधा ही संतशिरोमणी होती. गोपी गोपीभक्तीचा पाया होत्या, तर राधा ही गोपीभक्तीचा शिखर होती. गोपींना कधी कधी अहंकाराची बाधा होत असे; परंतु राधेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आजीवन अहंमुक्त राहिली. राधेसाठी कृष्णच सर्वकाही होता. ती पूर्णपणे श्रीकृष्णाची झाली होती. तिला स्वेच्छा उरलीच नव्हती. तिच्या मनात येणारा प्रत्येक विचार हा श्रीकृष्णाचाच होता. तिला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली होती.
२. ‘राधेत कृष्ण आणि कृष्णात राधा’, असे होणे
राधा कृष्णमय झाल्यामुळे ती कृष्णाची छाया बनली होती आणि ती कृष्णाचे प्रतिबिंबही होती. तिला स्वतःचे अस्तित्वच उरले नव्हते. दृश्य डोळ्यांनी राधा आणि कृष्ण निराळे होते; पण अंतरी ते एकच झाले होते. त्यांच्यातील अद्वैतामुळे राधातत्त्व आणि कृष्णतत्त्व निराळे न रहाता, एकच झाले होते. भक्त आणि भगवंत यांच्यातील हे अद्वैत सर्वांना कळण्यासाठी श्रीकृष्ण राधेचा धावा करत होता, तर राधा कृष्णाचा. राधेला जरी कृष्णाच्या चरणांची धूळ होण्याचा ध्यास लागला असला, तरीही श्रीकृष्णाने परमभक्त राधेला चरणांशी स्थान न देता, स्वतःच्या हृदयात ठेवले. राधा-श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून एकरूप होत गेल्याने तिला श्रीकृष्णासारखेच रूप प्राप्त झाले, उदा. तिचे नयन निळसर झाले. तिचे ओठ गुलाबाच्या उमलणार्या कळीप्रमाणे नाजुक गुलाबी झाले. तिची गोरी काया कृष्णासारखी निळसर होऊ लागली. तिच्या चेहर्यावर कधीच विरहाचे दुःख न दिसता श्रीकृष्णाचे मधुर स्मित सतत राहू लागले. तिला पहाणार्यांना श्रीकृष्णाची तीव्रतेने आठवण होऊन त्याच्याप्रती भक्तीभाव जागृत होऊ लागला.
३. भगवंतावरील निस्सीम भक्ती कशी असते, याचे मूर्तीमंत रूप म्हणजे राधा !
राधा सूक्ष्मातून श्रीकृष्णाच्या चरणांचे स्मरण करायची. तिच्या भावामुळे तिला श्रीकृष्णाच्या चरणांचे स्पष्ट दर्शन होत होते आणि त्या चरणांमध्ये तिला श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून हसतांना दिसायचा. श्रीकृष्णाच्या चरणांशी एकरूप होण्याचा ध्यास करीत ती कधी त्याच्या चरणांशी एकरूप झाली, हे तिचे तिलाही समजले नाही. ‘देवावर प्रेम कसे करावे ?’, ते राधा आणि गोपी यांच्याकडून शिकावे. ‘भगवंतावरील निस्सीम भक्ती कशी असते ?’, याचे मूर्तीमंत रूप म्हणजे राधा होय. जिच्या भक्तीचे वर्णन करण्यासाठी शब्दही थिटे पडतात, ऋषींच्याही लेखणीला पूर्णविराम मिळत नाही आणि देवताही कौतुक करून थकतात, अशी ती ‘राधा’ होय. ‘राधा’ हे निरपेक्ष प्रेमाचे साकार रूप होय.
– सुश्री मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
![]() |


‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?
कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा कार्याप्रतीच्या साक्षीभावाचे उदाहरण !