जुन्या बँक खात्यांमधील पडून राहिलेले पैसे परत मिळवा ! – भारतीय रिझर्व्ह बँक

प्रतिकात्मक इमेज

मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांना त्यांच्या जुन्या किंवा निष्क्रीय बँक खात्यांमध्ये पडून राहिलेले पैसे परत मिळवण्यासाठी विशेष आवाहन केले आहे. अनेकदा नागरिक त्यांची जुनी बँक खाती वापरणे बंद करतात. यामुळे त्या खात्यांमधील रक्कम तशीच पडून रहाते. नियमांनुसार २ वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रीय राहिलेली खाती किंवा १० वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही हक्क न सांगितलेली रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘डीईए’ निधीमध्ये हस्तांतरित केली जाते; मात्र ही रक्कम पूर्णपणे सुरक्षित असून मूळ खातेदार किंवा त्यांचा कायदेशीर वारसदार या पैशांवर कधीही आपला हक्क सांगून ते परत मिळवू शकतो, अशी माहिती प्रसारित केली आहे.

पैसे परत मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या सोप्या तीन पायर्‍या !

१. नागरिकांनी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आवश्यक केवायसी कागदपत्रे, उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन परवाना देणे आवश्यक आहे. बँकेद्वारे पडताळणी केल्यानंतर ही रक्कम व्याजासह परत केली जाते.

२. आपली हक्काची रक्कम शोधण्यासाठी ‘आर्.बी.आय.’ने ‘उद्गम’ हे विशेष वेब पोर्टलही चालू केले आहे. त्यावर ३० बँकांची माहिती उपलब्ध आहे.

३. अधिक माहितीसाठी नागरिक बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा ९९९९० ४१९३५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधू शकतात.