केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ

पणजी, ५ जुलै (वार्ता.) – गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधील बहुचर्चित म्हादई नदी पाणीवाटपासंबंधी वादाचा निकाल प्रलंबित असतांना केंद्रशासनाने म्हादई जलतंटा लवादाच्या कार्यकाळाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने याविषयी प्रसारित केलेल्या अधिसूचनेनुसार लवादाचा कार्यकाळ १६ ऑगस्ट २०२६ ते १६ ऑगस्ट २०२७ असा वाढवण्यात आला आहे.

लवादाने केंद्रशासनाला म्हादई नदीच्या पाणीवाटपाच्या संदर्भातील प्रलंबित सूत्रांवर अहवाल पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याची विनंती केली होती. त्यानुसार आंतरराज्य नदी जलविवाद कायदा, १९५६ मधील ५(३) अंतर्गत ही मुदतवाढ संमत करण्यात आली. म्हादई नदी पाणीवाटपासंबंधी हा वाद सोडवण्यासाठी नोव्हेंबर २०१० मध्ये लवादाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ८ वर्षांच्या सुनावणीनंतर लवादाने ऑगस्ट २०१८ मध्ये अंतिम निवाडा घोषित केला; मात्र त्या निवाड्यावर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांनी आक्षेप घेतल्याने या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही.