खासगी आस्थापनाकडे वीजवितरणाचे काम सोपवण्यास सुदिन ढवळीकर यांचा विरोध

पणजी, ५ जुलै (वार्ता.) – वीज वितरणाच्या कामासाठी सरकारने टाटा पॉवर किंवा अन्य कोणत्याही आस्थापनाला अनुमती दिलेली नाही. पंचायती, पालिका यांनी ‘ना हरकत’ दाखला देऊ नये, असे वीजमंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ‘‘सरकारची अनुमती न घेता आस्थापन जर थेट पंचायती किंवा नगरपालिका यांच्याकडे ‘ना हरकत’ दाखल्यासाठी जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. टाटा पॉवर आस्थापनाला काम दिल्याचा विजय सरदेसाई यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. आम्ही वीज क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली असल्याने सरकार वीजवितरणाचे काम कोणत्याही आस्थापनाकडे देणार नाही. मोठा खर्च करून वीज उपकेंद्रे उभारली आहेत. याखेरीज ठिकठिकाणी भूमीगत वीजवाहिन्या टाकलेल्या आहेत. अशा वेळी कोणत्याही खासगी आस्थापनाकडे वीजवितरणाचे काम सोपवणे याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. मी मंत्री म्हणून पदावर असेपर्यंत हे होऊ देणार नाही.’’
‘सरकार वीजवितरणाचे खासगीकरण करू पहात असून हे काम टाटा पॉवर आस्थापनाकडे देण्यात आले आहे’, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता. काही ग्रामपंचायतींकडे या आस्थापनाने अनुज्ञप्ती मिळवण्यासाठी संपर्क केला असल्याचे सूत्र त्यांनी उपस्थित केले होते; मात्र वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी हे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. राज्यातील वीजवितरण व्यवस्था सध्या पूर्णपणे वीज खात्याकडे असून वितरण अनुज्ञप्ती देण्याचा अंतिम अधिकार वीज नियामक आयोगाकडे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या टाटा पॉवर या आस्थापनाकडून महाराष्ट्र, देहली, राजस्थान आणि ओडिशा या ४ राज्यांमध्ये वीजवितरण चालू आहे. गोवा आणि कर्नाटक या राज्यांत प्रवेशासाठी प्रक्रिया चालू असून अंतिम संमती मिळालेली नाही. कर्नाटक सरकारने याला विरोध दर्शवला आहे. इतर काही राज्यांमध्येही हे आस्थापन वीजवितरण अनुज्ञप्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
आषाढी वारीमध्ये प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा
कोल्हापूर येथील उद्योजिका आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा वाडीकर ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित
केंद्रशासनाकडून म्हादई जलतंटा लवादाला आणखी १ वर्षाची मुदतवाढ
देवळाली छावणी बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत गोवंश तस्करी; कुख्यात ‘सम्राट टोळी’वर ‘मकोका’अंतर्गत कारवाई !