आषाढी वारीमध्ये प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा

वारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित डावीकडून चौथे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

पंढरपूर – आषाढी वारीच्या वेळी वारकरी भाविकांना तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या वेळी प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची (एअर ॲम्ब्युलन्सची) सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. वारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की, पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ ठिकाणी सुसज्ज अतीदक्षता विभाग (आय.सी.यू.), १५६ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ फिरते ‘आरोग्य दूत’, तसेच ३ सहस्र ८७ वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि ३०२ तज्ञ वैद्यकीय अधिकारी कार्यरत रहाणार आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

‘आरोग्य संपन्न वारी’ आणि ‘वारी साहाय्य’ या उपक्रमांतून डिजिटल आरोग्य सेवा पुरवण्यात येणार असून पंढरपुरात ३ दिवस विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. बैठकीनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि रुग्णसेवा यांची पहाणी करत अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या.