आळंदी ते पंढरपूर अशी २२५ किलोमीटरची ‘धाव वारी’ यशस्वी !

१६ धावपटूंचे ३ दिवसांत २२५ किलोमीटर अंतर पार

पुणे – निगडीतील धावपटू भूषण तारक हे गेली ५ वर्षे पालखी मार्गावर ‘धाव (रन) वारी’ हा उपक्रम राबवत आहेत. आळंदी ते पंढरपूर वारीचा मार्ग असतो. यंदा प्रथमच पालखी मार्गावर २२५ किलोमीटरसाठी ‘शक्ती धाव’, १०० किलोमीटरची ‘भक्ती धाव’ वारी आणि ५० किलोमीटरची ‘श्रद्धा धाव’ वारी हे उपक्रम राबवले. सलग ३ दिवस धावत या धावपट्टूंनी ४ जुलै या दिवशी ‘पांडुरंगा’चे दर्शन घेतले.

२२५ किलोमीटरसाठी १६ धावपटूंनी सहभाग घेतला. आळंदीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापासून २ जुलै या दिवशी प्रारंभ केला. यात ३ टप्पे करण्यात आले होते. ४ जुलै या दिवशी पहाटे ५ वाजता पंढरपूरमधील ‘श्री विठ्ठल मंदिरा’जवळ पोचून विठ्ठलाचे दर्शन घेतले. यात प्रति ५ किलोमीटर अंतरावर संयोजकांनी २३ स्वयंसेवकांच्या साहाय्याने पाणी, ताक, थंडपेय, केळी आदींची व्यवस्था केली होती. फलटण ते पंढरपूर या १०० किलोमीटरच्या ‘भक्ती धाव’ वारी आणि माळशिरस ते पंढरपूर अशी ५० किलोमीटरची ‘श्रद्धा धाव’ वारी आयोजित केली होती. त्याला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला.

उपक्रम संयोजक भूषण तारक म्हणाले, ‘‘वारी करण्याची इच्छा लहानपणापासून होती. वारीला धावण्याची जोड देण्याची कल्पना सुचली. पहिली ५ वर्षे मित्रांसमवेत धावलो. या वर्षी त्याला सामुहिक स्वरूप दिले. या धाववारीत कर्नाटक, मुंबई आणि पुण्ो येथून धावपटू सहभागी झाले होते.’’