कोल्हापूर येथील उद्योजिका आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. मनीषा वाडीकर ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित

डावीकडून आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर, पुरस्कार घेतांना सौ. मनीषा वाडीकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्रातील उद्योग, सहकार, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या ४२ कर्तबगार लोकांना ‘लोकमत समुहा’च्या वतीने ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात कोल्हापूर येथील सनातन संस्थेच्या साधिका आणि उद्योजिका सौ. मनीषा वाडीकर यांनाही ‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ‘आयकॉन्स ऑफ साऊथ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘हॉटेल सयाजी’ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ज्येष्ठ विधीज्ञ खासदार उज्ज्वल निकम, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, ‘लोकमत’चे संपादकीय विभागाचे प्रमुख राजेंद्र दर्डा, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्या समवेत सौ. मनीषा वाडीकर, श्री. नितीन वाडीकर आणि कु. पूजा वाडीकर

या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘लोकमत’ने नवोदित आणि दिग्गजांचा ‘आयकॉन’मध्ये समावेश केला आहे. त्यांच्या जीवनप्रवासाची माहिती भविष्यातील इतिहास बनेल. त्यांच्यामुळे अनेकांची प्रगतीची द्वारे उघडली जातील.’’ विधीज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, ‘‘ज्यांचा सत्कार झाला आणि पुरस्कार मिळाले, त्यातून भावी पिढी घडवायची आहे, तसा ध्यास सर्वांनी घ्यावा. माणूस कितीही मोठा झाला, तरी त्याने नीतीमत्ता आणि माणुसकी सोडता कामा नये.’’

उद्योजिकेच्या माध्यमातून ठसा उमटवणार्‍या सौ. मनीषा वाडीकर ! 

‘लोकमत आयकॉन्स’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी सौ. मनीषा वाडीकर आणि श्री. नितीन वाडीकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या दामले कुटुंबात जन्मलेल्या सौ. मनीषा यांनी घरातून मिळालेले व्यवसायाचे बाळकडू उद्योजक पती श्री. नितीन वाडीकर यांच्या साथीने पुढे नेले. त्यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी ‘शहाजी लॉ महाविद्यालयातून ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन’पूर्ण केले असून संगणकीय आणि लेखा विभागाचे कौशल्य आत्मसात् करत व्यवस्थापनाची धुरा समर्थपणे सांभाळली. ३० वर्षांत दांपत्याने ६ कारखाने उभे केले. त्यांची मुलगी पूजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याचे कामकाज पहाते. सौ. वाडीकर या ‘करवीरनगर वाचन मंदिरा’च्या संचालिका आणि ‘लक्ष्मीबाई पतसंस्थे’च्या अध्यक्षा आहेत. त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतात.  साधनेमुळेच हे सर्व करण्याचे बळ मिळते, अशी त्यांची श्रद्धा आहे.