देवळाली छावणी बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता कमावल्याचा आरोप !

प्रतिकात्मक इमेज

नाशिक – देवळाली छावणी बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वर्ष २०१२ च्या बॅचमधील अधिकारी अजयकुमार यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता कमावल्याच्या आरोपाखाली केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला आहे. नोकरीच्या प्रारंभी ५२ सहस्र रुपये संपत्ती घोषित करणार्‍या अधिकार्‍यांच्या मालमत्तेत कोट्यवधी रुपयांची वाढ झाली. या प्रकरणी सविस्तर अन्वेषण चालू आहे.

‘अजय कुमार त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात मालमत्तेविषयी समाधानकारक हिशोब सादर करण्यात अयशस्वी ठरले’, असा अन्वेषण यंत्रणेचा आरोप आहे.  परिणामी या प्रकरणात त्यांची पत्नी आणि आई यांना सहआरोपी बनवले आहे.

त्यांची एकूण मालमत्ता अंदाजे ५२ सहस्र ४२८ रुपये होती; मात्र १० वर्षांच्या आत त्यांची मालमत्ता वाढून ती ५ कोटी ५९ लाख रुपयांपर्यंत झाली. याच काळात त्यांनी ५ कोटी १७ लाख रुपये खर्चही केले. ‘त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या आधारावर एवढ्या मोठ्या संपत्तीचा कोणताही स्पष्ट आधार नाही’, असे यंत्रणेला लक्षात आले. त्यांच्याकडे अंदाजे ५ कोटी ७२ लाख किमतीची बेहिशेबी मालमत्ता आढळली; मात्र ते समाधानकारक कागदपत्रे किंवा उत्तरे देण्यास अपयशी ठरले.