आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !

  • इंद्रायणीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाकडून सतर्कतेची चेतावणी

  • वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

  • दर्शन मंडपासाठी ५० गुंठे जागा अधिग्रहित !

आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त लाखो वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्री प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज झाली आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कडक नियोजन करण्यात आले असून दुसरीकडे मावळ भागातील संततधार पावसामुळे पवित्र इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी नगर परिषद आणि पोलीस यांनी भाविकांना नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.

मावळमधील पावसामुळे इंद्रायणीला पूर; घाटावर सुरक्षा रक्षक तैनात !

मावळ तालुक्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे देहू आणि आळंदी मध्ये इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आळंदी घाटावरील प्रसिद्ध त्रिवेणी-भागीरथी कुंड पूर्णपणे पाण्याखाली गेले असून भक्त पुंडलिक मंदिरासमोरील खालच्या परिसरातही पाणी शिरले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नदी घाटाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून ध्वनीक्षेपकावरून सतत सूचना दिल्या जात आहेत. नदीकाठच्या रहिवाशांनाही सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

घातपात टाळण्यासाठी ‘खाकी’चा कडेकोट बंदोबस्त; सीसीटीव्हीचे लक्ष्य !

आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीत ७ ते ८ लाख वारकरी आले आहेत. या प्रचंड गर्दीच्या सुरक्षेसाठी शहरात व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घातपाताच्या घटना टाळण्यासाठी संवेदनशील भागांत सीसीटीव्ही छायाचित्रक आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मंदिर परिसरात वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वारकर्‍यांच्या सोयीसाठी ‘दर्शन मंडपा’चे काम चालू !

लाखो भाविकांची दर्शन व्यवस्था सुलभ व्हावी आणि त्यांची असुविधा टाळावी, यासाठी प्रशासनाने इंद्रायणी काठावरील सर्व्हे क्रमांक १२४ मधील एका खासगी संस्थेची ५० गुंठे जागा तात्पुरती अधिग्रहित केली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी या संदर्भातील आदेश दिले असून तिथे आळंदी नगर परिषदेच्या वतीने तात्पुरता दर्शन मंडप आणि बांबूचे ‘रेलिंग’ उभारण्याचे काम वेगाने चालू आहे.