कर्नाटकात शेतकर्‍यांना हानी भरपाई देण्याचे श्रेय घेण्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्या आमदारांमध्ये मंत्र्यांसमोर बाचाबाची !

काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये बाचाबाची !

हासन (कर्नाटक) – येथे जलसंपदामंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासमोर बेलूरु तालुक्यातील गंगूरु गावात काँग्रेसचे आमदार के.एम्. शिवलिंगे गौडा आणि भाजपचे आमदार एच्.के. सुरेश यांच्यात शेतकर्‍यांना हानी भरपाईची रक्कम देण्यावरून वाद झाला.

एत्तिनहोल प्रकल्पाच्या कामाची पहाणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री रामलिंगा रेड्डी आले होते. या वेळी ज्या शेतकर्‍यांनी एत्तिनहोळे प्रकल्पासाठी भूमी दिली आहे, त्यांना सरकारने २८ कोटी रुपयांची हानी भरपाई देणे शेष आहे. लवकरात लवकर ही भरपाईची रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी मंत्र्यांकडे केली. या वेळी ‘मी स्वतः बोलून २८ कोटी रुपये संमत करून घेतले आहेत’, असे आमदार के.एम्. शिवलिंगे गौडा यांनी सांगितले. या विधानावर संतापलेले आमदार एच्.के. सुरेश यांनी ‘प्रत्येक गोष्टीत हे लोक माझेच म्हणत असतात.

अरे तुमचे काय इथे, माझ्या मतदारसंघात तुम्ही काय बोलत आहात ?’, असे भाजपचे आमदार एच.के. सुरेश यांनी सांगितले. त्यावर ‘हो, २८ कोटी रुपये मिळवून देणारा मीच आहे.’ या वेळी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. हे भांडण पाहून मंत्री रामलिंगा रेड्डी शांत राहिले. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली.

संपादकीय भूमिका

शेतकर्‍यांना हानी भरपाई देणे हे लोकप्रतिनिधी आणि सरकार यांचा कर्तव्य असतांना त्याच्यावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांना लोकप्रतिनिधी म्हणता येईल का ?