पाक सैन्याने काश्मिरींना शस्त्रे दिली ! – POK Leader

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी निदर्शनात आरोप

रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकारच्या विरोधातील निदर्शने सातत्याने तीव्र होत चालली आहेत. २ जुलैला या आंदोलनाच्या २४ व्या दिवशी रावलकोट येथील ईदगाह मैदानात सुमारे ८० सहस्र लोक जमा झाले होते. आंदोलकांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी’चे प्रमुख सरदार अमन खान यांनी आंदोलकांना संबोधित करतांना पाकिस्तानी सैन्यावर गंभीर आरोप करतांना म्हटले की, काश्मिरींना शस्त्रे आणि दारूगोळा पाकिस्तानी सैन्यानेच दिला होता; पण आता तेच लोक त्यांना ‘आतंकवादी’ म्हणत आहेत.

अमन खान यांनी दावा केला की, फेब्रुवारी २०२५ मध्ये रावलकोट येथे जैश-ए-महंमदचे एक मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये लोक उघडपणे एके-४७ रायफल आणि तलवारी घेऊन सहभागी झाले होते. रावलकोटच्या तत्कालीन उपायुक्तांनी या मोर्चाला केवळ अनुमतीच दिली नव्हती, तर सुरक्षाही पुरवली होती. आधी शस्त्रास्त्रांसह मोर्चा काढू दिला आणि आता आम्हाला ‘आतंकवादी’ म्हटले जात आहे.

आंदोलन पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होण्याच्या मागणीपर्यंत पोचू शकते !

आंदोलकांचे म्हणणे आहे की, त्यांचे हे आंदोलन ३८ प्रमुख मागण्यांसाठी चालू आहे. अमन खान यांनी चेतावणी दिली की, जर सरकारने या मागण्या लवकरच मान्य केल्या नाहीत, तर हे आंदोलन केवळ सुधारणांपुरते मर्यादित रहाणार नाही, तर पाकिस्तानपासून पूर्णपणे वेगळे होण्याच्या मागणीपर्यंत पोचू शकते.

भारतासमवेत संवादाचीही झाली चर्चा

सभेतील काही वक्त्यांनी पाकिस्तानचे नियंत्रण फेटाळून लावत भारतासमवेत संवाद वाढवण्याची आवश्यकताही बोलून दाखवली. अमन खान म्हणाले की, पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नाही आणि या क्षेत्राची आवश्यकता पाकिस्तानला अधिक आहे, येथील लोकांना नाही.

परदेशी लोकांचाही पाठिंबा

पाकव्याप्त काश्मीरमधील या आंदोलनाला परदेशात रहाणार्‍या लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. अनेक देशांमधील पाकिस्तानी दूतावासबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत. यामुळे हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय बनत चालले आहे.

संपादकीय भूमिका

जे गेली अनेक देशके भारत सांगत आहे, ते आता पाकव्याप्त काश्मीरमधील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. आता जागतिक समुदायाने पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करायला हवे !